राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गलगंड पुनर्सर्वेक्षण मोहिमेचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण संपन्न

राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गलगंड पुनर्सर्वेक्षण मोहिमेचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण संपन्
रत्नागिरी : राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गलगंड पुनर्सर्वेक्षण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम रत्नागिरी जिल्हा प्रशिक्षण केंद्र येथे नुकताच संपन्न झाला. प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या हस्ते करण्यात आले. या मोहिमेंतर्गत ऑगस्ट ते डिसेंबर २०२६ दरम्यान प्रशिक्षित अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील ४० शाळांमधील इयत्ता पहिली ते सहावी मधील विद्यार्थ्यांची गलगंड तपासणी केली जाणार आहे.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर येथील प्रशिक्षक डॉ. विनायक भोई, रत्नागिरी जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे डॉ. शरण काठोळे तसेच आरोग्य सहाय्यक शैलेश वाघाटे यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात गलगंडाचे प्रमाण, आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे विकार तसेच त्यांचे प्रतिबंध व नियंत्रण याबाबत माहिती संकलित करण्यासाठी गलगंड पुनर्सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने सर्वेक्षणाची पद्धत, विद्यार्थ्यांची तपासणी, माहिती संकलन, नोंदणी व अहवाल सादरीकरण याबाबत प्रशिक्षणार्थींना सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले.
या जिल्हास्तरीय प्रशिक्षणास रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, आरोग्य सहाय्यक व आरोग्य सेवक उपस्थित होते.



