कळझोंडी-वरवडे वर्षांपासून बंद आहे बससेवा, विद्यार्थी हवालदिल
ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी घातले लक्ष : धाडस दाखवून सत्य परिस्थिती समोर आणणाऱ्या विद्यार्थ्यांचा करणार गौरव

रत्नागिरी : कळझोंडी – वरवडे रोडची दुरावस्था आणि त्यावरील सहा वर्षांपासून बंद असलेली बस सेवा याबाबतचा व्हिडीओ नुकताच विद्यार्थ्यांकडून प्रसिद्ध झाला. याची गंभीर दखल ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी घेतली आहे. याबाबत त्यांनी एसटी प्रशासनाशी बंद असणाऱ्या बससेवेबाबत चर्चा करून तातडीने यावर तोडगा काढण्याची मागणी केली. रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल माहिती घेवून त्यावर मार्ग काढला जाईल, असे जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी सांगितले. तसेच धाडस दाखवून सत्य परिस्थिती समोर आणणाऱ्या विद्यार्थ्यांचा आपण गौरव करणार असल्याचे प्रसाद सावंत यांनी सांगितले.
शिक्षण घेण्यासाठी जीव धोक्यात घालून जावं लागतंय अशी परिस्थिती आहे. रत्नागिरीतील कळझोंडी आणि वरवडे या मार्गावर पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दररोज खड्डे, चिखल आणि झाडी झुडपं तोडत शाळेत जावं लागतंय. एवढ्या दयनीय परिस्थितीशी दोन हात करत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागतंय यासारखे दुर्भाग्य नसल्याची खंत प्रसाद सावंत यांनी व्यक्त केली.
“मी आता कळझोंडी आणि वरवडे या मार्गावर उभी आहे. पहिलीपासून दहावीपर्यंत आम्ही दररोज इथे ये-जा करतो. पण या रस्त्याची अवस्था खूप बिकट आहे. दोन्ही बाजूला झाडी आहे, खड्डे आहेत. त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो.”, असे आज्ञा विचारे या विद्यार्थीनीने पत्रकारांच्या भूमिकेत राहून व्हिडीओ सादर करताना सत्य परिस्थिती समोर आणली.
सहा वर्षांपूर्वी इथून एसटी बस जायची. पण एका अपघातानंतर बससेवा बंद झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना पायीच जावं लागतं. पावसात अंगावर चिखल उडतो, मोठी वाहने वेगाने जातात आणि बाजूला जायला जागाच नसते, असेही एका विद्यार्थ्याने निदर्शनास आणून दिले.
विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे – “हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त व्हावा”. जीव मुठीत धरून शिक्षण घेणाऱ्या या मुलांसाठी प्रशासन कधी जागं होणार, असा सवाल प्रसाद सावंत यांनी उपस्थित केला आहे.



