मुख्य बातमी

रत्नागिरीतील संजीवन गुरुकुलमध्ये रानभाज्या प्रदर्शनाचे आयोजन 

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाचे पटवर्धन हायस्कूल संचलित गुरुवर्य रामचंद्र पुरुषोत्तम जोग संजीवन गुरुकुलमध्ये नुकतेच रानभाज्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. निसर्गाच्या सानिध्यातील सहज उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे तसेच विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील रानभाज्यांची ओळख व्हावी व आहारातील पौष्टिक घटकांचे महत्त्व समजावे या यामागचा उद्देश होता.

या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी टाकळा, भारंगी, रताळ्याची पाने, अळू, आळंबी, कुडाच्या शेंगा, केळफूलांची भाजी अशा अनेक प्रकारच्या विविध रानभाज्या आकर्षित पद्धतीने मांडल्या होत्या. विविध रानभाज्यांची नावे व त्याचे पौष्टिक गुणधर्म आरोग्यास होणारे फायदे आणि पारंपारिक पद्धतीने त्या बनवण्याच्या पद्धती याची माहिती विद्यार्थ्यांनी उपस्थितांना दिली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन “आत्मा”च्या तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हर्षला पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पावस मंडळ कृषी अधिकारी सागर माचाळ तसेच एमकेसीएलचे मुख्य अधिकारी श्री. कोलते, संस्थेचे विश्वस्त श्री. हातखमंकर, नितीन मोहिते, प्रशालेच्या मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, गुरुकुल प्रबंधक मनाली नाईक, सर्व वर्गाचे पालक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रानभाज्या म्हणजे निसर्गाने दिलेली पौष्टिक देणगी असून त्याचे संवर्धन आणि त्याचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे, हे मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना पटवून दिले. रानभाज्याज्यांची फक्त ओळखच नव्हे तर त्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना शेगळाची भाजी व भाकरी असा खाऊ देऊन त्यांना रानभाज्या खाण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. त्यासाठी इयत्ता पाचवीच्या पालक सोनाली कपिल शिवलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी गुरुकुलशिक्षका भक्ती वणजू व सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!