जिंदल कंपनी प्रशासन आणि उपोषणकर्त्यांमध्ये होणार ओपन कॅमेरा या पद्धतीची चर्चा
स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी व मच्छीमारांच्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाची सांगता

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील जिंदाल प्रकल्प यांच्या विरोधात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज (१५ ऑगस्ट) स्थानिक ग्रामस्थांचे शेतकरी व मच्छीमारांचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण पार पडले. सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या उपोषणाची सायंकाळी साडेचार वाजता सांगता करण्यात आली. यावेळी जेएसडब्ल्यू पोर्ट कंपनीचे अधिकारी सुदेश मोरे आणि जेएसडब्ल्यू एनर्जी कंपनीचे नरेश विलणकर हे अधिकारी उपस्थित होते.
उपोषणकर्ते आणि संबंधित ग्रामस्थ यांच्या समक्ष चर्चा होऊन येत्या सोमवारी याबाबत एक बैठक घेण्याचे जिंदलच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाहीररित्या सांगितले. या बैठकीत उपस्थित सर्व मुद्द्यांची चर्चा होईल. त्यावर मार्ग काढण्यात येईल. याबाबत योग्य त्या वरिष्ठांना कळविण्यात येईल, असे जिंदल प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्यावतीने सांगण्यात आले; मात्र ही बैठक ओपन कॅमेरा या पद्धतीची होईल असा आग्रह उपस्थित आंदोलनकर्त्यांनी धरला. यावर अशाच प्रकारची बैठक आयोजित करण्यात येईल. उपोषणकर्त्यांच्या व ग्रामस्थांच्या मागण्याबद्दल योग्य ते विचार वरिष्ठांकडे तात्काळ कळवण्यात येईल असे सांगण्यात आले आणि आणि श्री. मोरे आणि श्री. विलणकर यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना पाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली.



