मुख्य बातमी

आमदार किरण सामंत, रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून आंबा घाटाची पाहणी

आंबा घाटातून प्रवासी वाहतुकीचा मार्ग मोकळा केल्या बद्दल दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांचे आमदार सामंत यांनी मानले आभार

रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे आंबा घाट परिसरात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळून रस्ता खचला असून अनेक ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्याने अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या समवेत आंबा घाटाची प्रत्यक्ष पाहणी केली.

आंबा घाट हा रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून या मार्गावरील वाहतूक बंद किंवा मर्यादित झाल्याचा थेट परिणाम व्यापारी, उद्योजक, शेतकरी, वाहतूकदार तसेच सर्वसामान्य नागरिकांवर होत आहे. विशेषतः गणेशोत्सवाचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना मालवाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. त्यामुळे छोट्या वाहनांसाठी सुरक्षितपणे वाहतूक सुरू करता येईल का, याबाबत आजच्या पाहणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

यावेळी आमदार किरण सामंत यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचे प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल आभार मानले. तसेच घाटातील सद्यस्थिती, रस्त्याची सुरक्षितता, दरडी कोसळण्याची शक्यता, रस्त्याला पडलेल्या भेगा आणि वाहतुकीसाठी उपलब्ध असलेला सुरक्षित मार्ग यांची अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साखरपा, कोंडगाव, दाभोळे तसेच संगमेश्वर, देवरुख, साखरपा आणि पाली परिसरातील व्यापारी वर्गाची मोठी गैरसोय होत आहे. या भागातील व्यापारी आणि कार्यकर्त्यांकडून आंबा घाटातील मालवाहतुकीबाबत सातत्याने मागणी व पाठपुरावा केला जात आहे.

या मागणीची दखल घेत आमदार सामंत यांनी चारचाकी आणि सहाचाकी छोट्या मालवाहू वाहनांसाठी सुरक्षिततेच्या निकषांनुसार पर्यायी व्यवस्था करता येईल का, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र रस्त्याची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता ठेवूनच कोणताही निर्णय घेण्यात येणार आहे.

यासाठी पोलीस यंत्रणा, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच अन्य संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून घाटाची तांत्रिक व प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. रस्त्याची क्षमता, वाहतुकीचा भार, संभाव्य धोका आणि छोट्या वाहनांसाठी उपलब्ध सुरक्षित मार्ग यांचा अभ्यास करून पुढील निर्णय घेण्याबाबत चर्चा होणार आहे.

व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाशी समन्वयआंबा घाटातील अवजड वाहनांवरील बंदीमुळे व्यापारी वर्गासह शेतकरी आणि वाहतूकदारांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. कोकणातून कोल्हापूरकडे आणि पश्चिम महाराष्ट्रातून कोकणाकडे होणारी मालवाहतूक मोठ्या प्रमाणावर या मार्गावर अवलंबून आहे. त्यामुळे वाहतुकीवर मर्यादा आल्याने व्यवसायावर परिणाम होत असल्याची भावना व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार किरण सामंत यांनी प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवून नागरिकांच्या अडचणी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. आंबा घाटाची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेण्यामागेही सुरक्षिततेला धक्का न लावता शक्य तो वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

गणेशोत्सवाच्या खरेदी-विक्रीच्या पार्श्वभूमीवर व्यापारी वर्गाला मालाची वाहतूक सुरळीत होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आंबा घाटातून अवजड वाहनांना परवानगी देण्याऐवजी परिस्थितीनुसार मर्यादित क्षमतेच्या चारचाकी व सहाचाकी मालवाहू वाहनांना सुरक्षितपणे वाहतूक करता येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आजच्या पाहणीनंतर संबंधित विभागांशी सखोल चर्चा करून पुढील कार्यवाही करण्याचे संकेत देण्यात आले. अंतिम निर्णय हा रस्त्याच्या तांत्रिक सुरक्षिततेचा अहवाल आणि संबंधित यंत्रणांच्या शिफारशींवर आधारित राहणार आहे.

आंबा घाटातील वाहतुकीचा प्रश्न केवळ एका मार्गाचा नसून रत्नागिरी-कोल्हापूर या दोन जिल्ह्यांच्या व्यापार, उद्योग, शेती आणि दैनंदिन वाहतुकीशी संबंधित महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी छोट्या मालवाहू वाहनांसाठी सुरक्षित पर्याय उपलब्ध होतो का, यासाठी आमदार किरण सामंत आणि दोन्ही जिल्ह्यांचे प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे संगमेश्वर, देवरुख, साखरपा, पालीसह संपूर्ण परिसरातील व्यापारी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

यावेळी रत्नागिरी जिल्हाधिकारी मनोज जिंदल कोल्हापूर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, प्रांताधिकारी जीवन देसाई, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र करपे, उपपोलीस अधिक्षक सुरेश कदम,जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, तहसीलदार अमृता साबळे, राष्ट्रीय महामार्गाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!