जामदे पुलाजवळ एसटी-कार अपघातात तिघे जखमी

राजापूर : तालुक्यातील केळवली फाटा येथील जामदे पुलाजवळ एसटी बस आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्यात झालेल्या अपघातात कारमधील तिघे जखमी झाले. एसटी बसने कारला जोरदार धडक दिल्यानंतर कार काही अंतरापर्यंत बससोबत फरफटत गेली; मात्र, कारचालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. शनिवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या प्रकरणी कारचालक अमित रमेश साटम (रा. शिरगाव, ता. देवगड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एसटी चालक गणपती भाऊसाहेब जाधव यांच्याविरोधात राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातात कारमधील युधीराज भिकाजी राणे (वय ३२), विघ्नेश रामदास म्हाळवदे (वय २५) आणि राज रामदास म्हाळवदे (वय २२, तिघेही शिरगाव, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) हे तिघे जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित साटम हे आपल्या मित्रांसह कार (क्र. एमएच ०७ बीजी ९०९७) मधून शिरगाव, देवगड येथून पुण्याच्या दिशेने निघाले होते. केळवली-पाचल मार्गे अणुस्कुरा दिशेने जात होते. त्याचदरम्यान, कणकवली आगाराची भुईबावडा-रिंगेवाडी-खारेपाटण मार्गावरील एसटी बस (एमएच २० बीएल ३०७९) वैभववाडीच्या दिशेने येत होती. गणपती भाऊसाहेब जाधव (वय ४७) हे बस चालवत होते, तर दशरथ गोविंद जाधव हे वाहक म्हणून होते.
केळवली फाट्यावरील जामदे पुलाजवळ वळणाच्या रस्त्यावर बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण राहिले नाही आणि बसने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. धडकेनंतर कार एसटी बससोबत काही अंतर फरफटत गेली. या दुर्घटनेत कारमधील तिघांना दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव आणि पोलिस हेडकॉन्स्टेबल रहिम मुजावर यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन उपचार करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच राजापूर एसटी आगाराच्या आगारप्रमुख काव्या पेडणेकर आणि वाहतूक नियंत्रक अजय सिडाम यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच सिंधुदुर्गचे विभागीय वाहतूक अधीक्षक निलेश लाड यांनीही घटनास्थळी पाहणी केली.
या अपघातात एसटी बसचे सुमारे ४० हजार रुपये, तर कारचे सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणी राजापूर पोलिसांनी एसटी चालक गणपती जाधव यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास राजापूर पोलिस करीत आहेत.



