जांभेकर विद्यालयात ४०० विद्यार्थ्यांनी घेतली मृद व जलसंधारणाची शपथ

रत्नागिरी : सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात मृद व जलसंधारण दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेतील सुमारे ४०० विद्यार्थ्यांना मृद व जलसंधारण दिनानिमित्त शपथ देण्यात आली. माती व पाणी यांचे संरक्षण करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनासाठी सदैव प्रयत्न करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. संजना तारी होत्या. प्रमुख वक्ते म्हणून प्रशालेचे सहाय्यक शिक्षक तथा इको क्लबचे शिक्षक धनाजी वाघमोडे उपस्थित होते. मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने प्रभात फेरीचे आयोजन जयस्तंभ ते माळनाका आणि पुन्हा माळनाका ते जयस्तंभ या मार्गावर करण्यात आले. यात प्रशालेतील सर्व शिक्षकांसह सुमारे २०० विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी मृदा व जलसंधारण, जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन तसेच पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणारे संदेश दिले. प्रभात फेरीनंतर कार्यक्रमस्थळी माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेस प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. संजना तारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
धनाजी वाघमोडे यांनी मृद व जलसंधारण दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. माती ही शेतीचा व मानवी जीवनाचा आधार असून तिचे होणारे धूप व ऱ्हास रोखणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच पाण्याचा काटकसरीने वापर, पावसाच्या पाण्याचे संधारण, जलस्रोतांचे संरक्षण, वृक्षलागवड आणि पर्यावरण संवर्धन याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


