माय क्लिक फोटोग्राफी स्पर्धेत आराध्य आंबेकर प्रथम

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान मंगेश बापूजी तोरगलकर कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त ‘माय क्लिक’ फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत आराध्य अभिषेक आंबेकर याने प्रथम क्रमांक पटकावला.
महाविद्यालयातील इयत्ता अकरावी व बारावीच्या वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मोबाईलवर क्लिक केलेले विविध फोटो या स्पर्धेत पाहायला मिळाले. या स्पर्धेचे परीक्षण गेल्या आठ वर्षांपासून ‘वाह गोवा’ या प्रसिद्ध हॉटेलसाठी फोटोग्राफी व ब्लॉगिंग करणारे अनुभवी छायाचित्रकार अमेय दत्ते यांनी केले.
स्पर्धेत अकरावी वाणिज्यचा आराध्य अभिषेक आंबेकर याने प्रथम क्रमांक पटकावला. बारावी विज्ञानची सुमुखी श्रीराम केळकर हिने द्वितीय, तर अकरावी विज्ञानचा वेदांग विलास नाचणकर याने तृतीय क्रमांक मिळविला. या विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले.
