जिओ नेटवर्कमुळे उक्षी गाव संपर्कक्षेत्राबाहेर; संतप्त गावकऱ्यांचे कंपनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
ग्रामपंचायतीच्या पत्राची कारणे पुढे करून जिओ कंपनीची टाळाटाळ

रत्नागिरी : तालुक्यातील उक्षी गावामध्ये गेल्या दोन वर्षांपासून जिओ मोबाईल नेटवर्कच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. वारंवार तक्रारी करूनही कंपनी प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने संतप्त झालेल्या उक्षी आणि बनाची वाडी येथील ग्रामस्थांनी जिओच्या स्थानिक कार्यालयावर धडक देऊन जाब विचारला.
नेटवर्क अभावी दैनंदिन कामकाज, विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि ऑनलाईन शासकीय कामे पूर्णपणे ठप्प झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या काळात गावात जिओ कंपनीचे नेटवर्क उत्तम दर्जाचे मिळत असल्याने अनेक ग्रामस्थांनी प्रत्येकी दोन ते तीन सिमकार्ड खरेदी केली होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून उक्षी गाव आणि बानाची वाडी परिसरामध्ये नेटवर्क गायब झाले आहे. फोन लावण्यासाठी अथवा इंटरनेट वापरण्यासाठी नागरिकांना उंच टेकड्यांवर किंवा जंगलात जावे लागत आहे. दरमहा ३०० ते ४०० रुपयांचे रिचार्ज मारूनही सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांचे पैसे वाया जात आहेत.
या गंभीर समस्येबाबत माजी उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी कंपनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. महिन्याभरापूर्वी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गावात येऊन सर्व्हे केला असता नेटवर्क नसल्याची वस्तुस्थिती समोर आली होती. तरीही समस्येवर तोडगा न काढता आता ग्रामपंचायतीच्या पत्राची कारणे पुढे करून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप माजी उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे यांनी केला. सिमकार्ड विकताना कोणतीही मंजुरी न मागणारी कंपनी आता सेवा देताना अडवणूक करत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी तातडीने नेटवर्क टॉवर किंवा बूस्टर बसवून सेवा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने यावर तात्काळ तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
