रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे आंदोलन

रत्नागिरी : जिल्ह्यातील पदवीधर शिक्षकांचे जे समुपदेशन झाले ते अन्यायकारक झाले असल्यामुळे रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आज (२४ ऑगस्ट) रत्नागिरी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यातील गणित आणि विज्ञान शाखेच्या शिक्षकांच्या ४७० जागा या पवित्र पोर्टल माध्यमातून भरण्यात येणार आहेत ती भरती प्रक्रिया रद्द करून सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याप्रमाणे पदवीधर शिक्षकांचे समुपदेशन करत असताना त्यांचे विषयानुसार वर्गीकरण न करता कार्यरत सर्व पदवीधर शिक्षकांना मंजूर असलेल्या सर्व रिक्त पदांवरती सामावून घेतले या मागणीसाठी रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले.
या संदर्भात राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्याकडे सविस्तरपणे विषय मांडला. त्यावेळी त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला आवश्यक ते सूचना दिल्या व हे समुपदेशन थांबवावे असेही सांगितले; मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही.
जे भाषेचे शिक्षक आहेत त्यांना उपशिक्षक म्हणून पदावर नेमले जाण्याचा घाट घातला जात आहे. ज्यांनी वीस- पंचवीस वर्षे शिक्षक सेवा केली आहे अशांना आता उपशिक्षक म्हणून नेमले जाणार आहे; परंतु या सगळ्या प्रक्रियेतून जे समायोजन होत आहे आणि जे नवीन भरती करण्यात येणार आहे ती चुकीच्या पद्धतीने होणार आहे, असे मत प्राथमिक शिक्षक समितीचे आहे, म्हणूनच संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षक संघटना एकत्र येऊन आज जिल्हा परिषद कार्यालय समोर आंदोलन केले.



