मुख्य बातमी

अरांक्षा यादव रत्नागिरीच्या नव्या उपविभागीय पोलिस अधिकारी

रत्नागिरी : रत्नागिरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर यांची पालघर येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी २०२३ बॅचच्या आयपीएस अधिकारी अरांक्षा यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील आठ परिविक्षाधीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेचे आदेश मंगळवारी (२५ ऑगस्ट) गृह विभागाकडून जारी करण्यात आले असून, त्यामध्ये अरांक्षा यादव यांचा समावेश आहे.

अरांक्षा यादव यांनी यापूर्वी कोल्हापूर येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. आता त्यांच्याकडे रत्नागिरी उपविभागाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कोल्हापूर येथे कार्यरत असताना त्यांनी अंमली पदार्थांविरोधातील कारवाईला गती देण्यावर विशेष भर दिला होता.

रत्नागिरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर यांची काही दिवसांपूर्वी पालघर येथे जातपडताळणी विभागाचे डीवायएसपी म्हणून बदली झाली होती. मात्र, त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती न झाल्याने माईनकर हेच काही काळ पदाचा कार्यभार सांभाळत होते. आता अरांक्षा यादव यांच्या नियुक्तीमुळे रत्नागिरी उपविभागाला नवे नेतृत्व मिळाले आहे.

अरांक्षा यादव या २०२३ बॅचच्या आयपीएस अधिकारी असून, त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२२ मध्ये देशात २०२ वा क्रमांक पटकावला होता. मूळच्या हरियाणाच्या असलेल्या यादव यांचे शिक्षण दिल्लीतील प्रतिष्ठित सेंट स्टीफन्स कॉलेज तसेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून झाले आहे.

सुरुवातीला त्यांना गुजरात कॅडर मिळाले होते; मात्र २०२१ बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी अनमोल मित्तल यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांची महाराष्ट्र कॅडरमध्ये बदली करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!