लोटे एमआयडीसीत कोकाकोला कंपनीचे सांडपाणी उघड्यावर सोडल्याचा ग्रामस्थांचा आरोप
शेती, जलस्रोत व पर्यावरण धोक्यात; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तातडीने चौकशीची मागणी

खेड : लोटे अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील कोकाकोला कंपनीकडून दुर्गंधीयुक्त सांडपाणी उघड्यावर सोडले जात असल्याचा गंभीर आरोप पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केला आहे. या सांडपाण्यामुळे शेती, माती, जलस्रोत तसेच परिसरातील पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून, या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही महिन्यांपासून, विशेषतः पावसाळ्याच्या सुरुवातीपासून, कंपनी परिसरातून दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर सोडले जात असल्याचा आरोप आहे. हे पाणी नैसर्गिक पाण्याच्या मार्गाने परिसरात जात असल्याने त्याचा शेती व जलस्रोतांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
अजगणी गावचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष अशोक कृष्णा धाडवे यांनी कंपनीकडून सांडपाणी सोडले जात असल्याचा आरोप केला. परिसरातील पाण्याच्या स्रोतांवर मोठ्या लोकवस्तीचे अवलंबित्व असल्याने हा प्रकार गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरातील स्वयंभू मंदिर तसेच नैसर्गिक जलस्रोतांमुळे या पाण्याचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचेही ग्रामस्थांनी नमूद केले.
दरम्यान, कंपनी परिसरातील ड्रेनेज व्यवस्थेबाबतही ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. हे ड्रेनेज केवळ पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी असताना कंपनीचे सांडपाणी त्यातून सोडले जात आहे का, असा सवाल करण्यात आला आहे. काही ग्रामस्थांनी कंपनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाणी सोडल्याचे दिसून आल्याचा दावा करत संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी केली.
‘आंतरराष्ट्रीय कंपनीकडूनच नियमांचे उल्लंघन होत असेल तर इतर कंपन्यांवर नियंत्रण कसे?’ लोटे एमआयडीसीतील विविध रासायनिक कंपन्यांमधून होणाऱ्या प्रदूषणाच्या प्रश्नावर सातत्याने चर्चा होत असताना, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपनीकडूनच सांडपाणी उघड्यावर सोडले जात असेल तर इतर कंपन्यांच्या प्रदूषणावर प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियंत्रण कितपत प्रभावी आहे, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. स्थानिक रोजगार आणि इतर प्रश्नांवरून यापूर्वीही चर्चेत राहिलेल्या या कंपनीच्या पर्यावरणीय जबाबदारीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सांडपाण्यामुळे परिसरातील शेती, माती, पाण्याचे स्रोत आणि पर्यावरणावर नेमका काय परिणाम झाला आहे, याची संबंधित विभागांनी तातडीने पाहणी करून वैज्ञानिक पद्धतीने तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सांडपाणी सोडण्याच्या प्रकाराची चौकशी करावी. कंपनीने पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केले असल्याचे तपासणीत आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, प्रश्न मार्गी न लागल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन, मोर्चा तसेच उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही काही ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे आता प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण यंत्रणा कोणत्या पद्धतीने पाहते, याकडे पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



