खेडमध्ये अल्पवयीन मुलाने तब्बल एक किलो सल्फर पावडर ऑनलाईन मागवली
माहिती समोर येताच पालकांसह मुलाची चौकशी

खेड : येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून तब्बल एक किलो सल्फर पावडर मागवल्याची माहिती समोर आली आहे. या ऑनलाइन ऑर्डरची माहिती पोलिस यंत्रणेला मिळाल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलाने ऑनलाइन माध्यमातून सल्फर पावडरची ऑर्डर केली होती. या खरेदीची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर संबंधित मुलाला तसेच त्याच्या पालकांना चौकशीसाठी बोलावले आहे. या प्रकरणाची अधिक माहिती घेण्यासाठी ठाणे क्राईम ब्रांचचे अधिकारी खेडमध्ये दाखल झाले आहेत. ऑनलाइन खरेदी, त्यामागील उद्देश, सल्फर पावडरची आवश्यकता आणि तिचा संभाव्य वापर याबाबत विविध अंगांनी चौकशी केली जात आहे.
प्राथमिक चौकशीत संबंधित मुलाने प्रयोग करण्यासाठी सल्फर पावडर मागवल्याचे सांगितले जात आहे. मात्र, एखाद्या प्रयोगासाठी तब्बल एक किलो सल्फर पावडरची ऑर्डर का करण्यात आली, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. सल्फर हे विविध औद्योगिक आणि प्रयोगशाळेतील उपयोग असलेले रसायन आहे. मात्र, त्याचा काही प्रकारच्या फटाक्यांमध्ये तसेच काही स्फोटक मिश्रणांमध्ये वापर होऊ शकतो. त्यामुळे अल्पवयीन मुलाकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात सल्फर मागविण्याच्या घटनेने सुरक्षा यंत्रणांचे लक्ष वेधले आहे.
संबंधित ऑर्डर नेमकी कुठून करण्यात आली, पेमेंट कोणत्या माध्यमातून झाले, सल्फर कुठे मागवण्यात आले, त्याचा प्रत्यक्ष वापर झाला आहे का, तसेच या खरेदीमागे अन्य कोणी व्यक्ती किंवा कारण आहे का, याबाबत पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झाली नसून संपूर्ण प्रकरणाबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती किंवा अंतिम निष्कर्ष अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.
त्यामुळे पोलिसांच्या अधिकृत तपासातून या ऑनलाइन ऑर्डरमागील नेमके कारण काय होते, हे स्पष्ट होणार आहे. मात्र, १७ वर्षीय मुलाने ऑनलाइन माध्यमातून तब्बल एक किलो सल्फर पावडर मागवल्याची घटना खेड तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.


