मुख्य बातमी

संस्कृत भाषेच्या बळकटीकारणासाठी सर्वांनी आपले सामर्थ्य वाढवा

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांचे प्रतिपादन

रत्नागिरी : रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात नाविन्यपूर्ण संस्कृत दिन साजरा प्रत्येकजण सामर्थ्यपूर्ण आहे. संस्कृत भाषेला आताच्या काळात अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. प्रत्येकजण विविध प्रकारे संस्कृत भाषेसाठी योगदान देण्यास सक्षम आहे. त्यामुळे संस्कृत भाषेच्या बळकटीकारणासाठी सर्वांनी आपले सामर्थ्य वाढवा असे प्रतिपादन भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले. ते रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात आयोजित संस्कृत दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्ष रूपाने बोलत होते.

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र येथे वेगळ्या आणि नाविन्यपूर्ण प्रकारे संस्कृत दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात उपकेंद्रातील लिपिक कल्पजा जोगळेकर यांनी संस्कृत गीत सादर केले. तसेच स्वरूप काणे यांनी संस्कृतमधून बातम्या सादर केल्या. शिवाय उपकेंद्रातील प्रा. अविनाश चव्हाण यांनी संत एकनाथ यांच्या अभंगाचे निरुपण संस्कृतमधून केले. प्रा. कानिफनाथ पंढरे व प्रा. रिया बिष्ट यांनी योग व प्राणायाम चे पूर्ण प्रात्यक्षिक सूचनांसह संस्कृतमधून सादर केले. याशिवाय उपकेंद्रातील प्रकल्प सहाय्यक सई ओक आणि जान्हवी पाध्ये यांनी अनुक्रमे धर्मशास्त्र आणि संगीतशास्त्र यांच्यातील मतितार्थ संस्कृतमधून उलगडला. उपकेंद्रातील कक्ष अधिकारी प्रथमेश घोसाळे, कार्यालय सहाय्यक करण कीर व लिपिक अपर्णा कोकरे यांनी संस्कृत भाषेतून सुसंवाद साधला.

या कार्यक्रमात गीत, योग, वार्ता, संवाद, साहित्य अशी संस्कृतची विविधांगी रूपे उलगडण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. दिनकर मराठे यांनी संस्कृत भाषा जाणणाऱ्या, बोलणाऱ्या अशा सर्वांनी सक्षमपणे संस्कृतचा पक्ष बळकट केला पाहिजे असे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!