आरवलीच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी दिनेश परकर यांची बिनविरोध निवड

संगमेश्वर : तालुक्यातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या आरवली या गावात महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते दिनेश दाजी परकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी दाखवलेल्या या एकमुखी विश्वासामुळे संपूर्ण आरवली गावात आणि परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दिनेश परकर हे केवळ एक यशस्वी व्यावसायिक असून, परिसरातील एक सक्रिय व उपक्रमशील व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. नुकतीच त्यांच्याकडे आरवली येथील प्रतिष्ठित उत्कर्ष सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. या मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सवादरम्यान विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम यशस्वीरीत्या राबवण्यात त्यांचा नेहमी पुढाकार असतो.
तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन दिनेश परकर यांचा विशेष सत्कार केला आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. याशिवाय स्वराधीश मित्र मंडळ (मुंबई), उत्कर्ष तरुण मित्र मंडळ (आरवली) आणि आरवली बाजारपेठ मित्र परिवाराच्या वतीनेही त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
आरवली गावात शांतता, सामाजिक ऐक्य आणि परस्पर सामंजस्य अधिक दृढ करण्यासाठी दिनेश परकर यांच्या अनुभवाचा व नेतृत्वाचा मोठा उपयोग होईल, असा विश्वास ग्रामस्थ व स्थानिक व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.



