संगमेश्वर आयटीआयमध्ये ‘सोलर टेक्निशियन’ पदासाठी कंत्राटी भरती; ७ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) संगमेश्वर, येथे पीपीपी अंतर्गत असलेल्या आय.एम.सी. मार्फत नवीन सुरू होणाऱ्या ‘सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)’ या व्यवसायासाठी कंत्राटी निदेशक पदाची एक जागा ठोक मानधनावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
डीजीटीच्या मानकानुसार पुढीलपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी किंवा तंत्रशास्त्र शाखेतील विद्युत अभियांत्रिकी विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी आणि विद्युत क्षेत्रातील किमान १ वर्षाचा अनुभव किंवा विद्युत अभियांत्रिकीमधील किमान द्वितीय श्रेणीतील पदविका आणि विद्युत क्षेत्रातील किमान २ वर्षाचा अनुभव किंवा सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) व्यवसायातील आय.टी.आय. प्रमाणपत्र परीक्षा व शिकाऊ उमेदवारी उत्तीर्ण तसेच विद्युत क्षेत्रातील किमान ३ वर्षाचा अनुभव.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह आपले अर्ज ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्टी वगळून कार्यालयीन वेळेत) ‘शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर, रामपेठ सप्तेश्वर रोड, ता. संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी’ या पत्त्यावर प्रत्यक्ष हस्तदेय स्वरूपात सादर करायचे आहेत.
विहित मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जांनुसार उमेदवारांची मुलाखत व व्यावसायिक चाचणी घेऊन निवड केली जाणार आहे. हे पद निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाचे असून रोजगाराची संधी शोधणाऱ्या पात्र उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सदस्य सचिव आय एम सी ऑफ आय.टी.आय. संगमेश्वर यांनी केले आहे.


