जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती नोंदवण्याची मुदत

रत्नागिरी : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमानुसार (एसआयआर) रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी आज (३१ ऑगस्ट) प्रसिद्ध करण्यात आली. १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित ही यादी जाहीर करण्यात आली असून, यावर दावे व हरकती नोंदवण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यानंतर अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी दिली.
प्रारूप मतदार यादी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कार्यालये तसेच जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांच्या पदनिर्देशित ठिकाणी उपलब्ध आहे. याशिवाय मतदारांना भारत निवडणूक आयोगाच्या eci.gov.in, मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या (महाराष्ट्र) ceoelection.maharashtra.gov.in, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या ratnagiri.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवरही आपले नाव तपासता येईल.
दावे व हरकतींसाठी विहित नमुने उपलब्ध असून, नाव नोंदणीसाठी नमुना क्र. ६, नावावर आक्षेप / वगळण्यासाठी नमुना क्र. ७, तर नोंदीतील दुरुस्ती किंवा पत्ता बदलासाठी नमुना क्र. ८ हे आहेत.
हे अर्ज संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे ३० सप्टेंबरपर्यंत सादर करता येतील. सर्व नागरिकांनी प्रारूप यादीत आपले नाव तपासून आवश्यकतेनुसार मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



