खेड येथे एसटी बसला अपघात; प्रवासी सुखरूप

खेड : तालुक्यातील वडगाव-खेड मार्गावर धावणाऱ्या एसटी बसला रविवारी (३० ऑगस्ट) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अस्तान – चाटव सीमेजवळ अपघात झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खेड आगाराची वडगाव – खेड एस.टी. बस (क्र. एमएच-१४-बीटी-२७५६) प्रवाशांना घेऊन मार्गस्थ झाली. ही गाडी अस्तान – चाटव सीमेजवळ पुलाच्या अलीकडे आली असताना अपघातग्रस्त झाली. बस अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये एकूण सहा प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती असून, सुदैवाने या अपघातात कोणताही प्रवासी जखमी झालेला नसल्याचे समोर आले आहे.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एसटी प्रशासनाकडूनही घटनास्थळाची माहिती घेण्यात आली. दरम्यान, बसचा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.
एसटी प्रशासनाकडून अपघाताची कारणे आणि बसच्या नुकसानीबाबत अधिकृत माहिती घेतली जात आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात कोणतीही फिर्याद दाखल नसल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.

