गुणवत्ता यादीत पाचेरी सडा नं. १ च्या विद्यार्थ्यांची उत्तुंग कामगिरी
अर्णव काजरोळकर आणि मानवी पंड्येचे उज्ज्वल यश

आबलोली (संदेश कदम) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत (स्कॉलरशिप) जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पाचेरी सडा नं.१ च्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. घोषित झालेल्या अंतिम गुणवत्ता यादीत शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी स्थान मिळवून शाळेच्या व परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या मध्ये परीक्षेत अर्णव आनंद काजरोळकर आणि मानवी अजित पंडये यांनी आपल्या कठोर परिश्रम आणि उत्कृष्ट अभ्यासाच्या जोरावर जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत यश संपादन केले आहे.
ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत या विद्यार्थ्यांनी पटकावलेल्या या यशामुळे पाचेरी सडा परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पंचायत समिती गुहागर येथे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी गटविकासाधिकारी श्री. शिंदे, गटशिक्षणाधिकारी श्री. गळवे व पाचेरी आगर केंद्राचे माजी केंद्र प्रमुख विश्वास खर्डे यांनी विद्यार्थांचे कौतुक केले.
या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक तसेच मुख्याध्यापक संजय वाघ, सहकारी शिक्षक सचिन लबडे, कीर्ती रुईकर व आनंद मुळे यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक यांनी सर्व सहकारी शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक, ग्रामस्थ व पालकांकडून विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.


