मुख्य बातमी

गणेशोत्सवात भाविकांची लूट खपवून घेणार नाही; अवाजवी भाडे आकारल्यास कठोर कारवाईचा इशारा

पोलीस व परिवहन विभागाची रिक्षा, बस वाहतूकदार संघटनांसोबत संयुक्त बैठक

रत्नागिरी : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमानी व भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात पोलीस व परिवहन विभाग आणि रिक्षा-बस वाहतूकदार संघटनांची संयुक्त बैठक पार पडली. गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची अवाजवी भाडे आकारून होणारी लूट, जादा प्रवासी वाहतूक अथवा गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणी करू नये, प्रवाशांच्या माहितीसाठी जिल्ह्यातील रेल्वे स्थानके व प्रमुख रिक्षा थांब्यांवर परिवहन विभागाने निश्चित केलेल्या रिक्षा भाडेदराचे फलक लावले जातील, रिक्षा स्टँडवर वाहने शिस्तबद्ध रीतीने उभी करावीत जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही, क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करू नये. तसेच प्रवाशांशी सौजन्याने वागावे, बसधारकांनी वाहनात आपत्कालीन दरवाजा, अग्निशामक यंत्र आणि प्रथमोपचार पेटी सुस्थितीत असल्याची खात्री करावी, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बसेसच्या सुटण्याच्या वेळेचे काटेकोर नियोजन बस मालकांनी करावे, चालकाने मद्यप्राशन करून अथवा धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्यास चालक आणि संबंधित बस मालक या दोघांवरही फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे निर्देश प्रशासनाने वाहतूकदारांना दिले आहेत.

प्रवासादरम्यान कोणत्याही रिक्षा किंवा बस वाहतूकदाराने अवाजवी भाडे आकारल्यास अथवा प्रवाशांशी उद्धट वर्तन केल्यास नागरिकांनी वाहनाचा क्रमांक व प्रवासाच्या तपशिलासह dyrto.08-mh@gov.in या ई-मेल आयडीवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या बैठकीस अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, मोटार वाहन निरीक्षक अरविंद फुलारी, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे, महामार्ग पोलीस निरीक्षक दीपाली जाधव, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय कांबळे यांच्यासह रिक्षा व बस वाहतूकदार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!