मुख्य बातमी

नगरसेविका सौ. पूजा दीपक पवार आयोजित “दीपसाज अलंकार स्पर्धा” उत्साहात संपन्न

सौ. पूर्वा चव्हाण यांनी पटकावला प्रथम क्रमांक : रत्नागिरी शहर प्रभाग क्र. ५ मधील महिलांचा स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग

रत्नागिरी : जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, लांजा-राजापूरचे आमदार किरण (भैय्या) सामंत तसेच रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ शिल्पा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका सौ. पूजा दीपक पवार यांच्यावतीने “दीपसाज अलंकार स्पर्धा २०२६” प्रथमच रत्नागिरी नगरपालिका प्रभाग क्रमांक ५ मध्ये आयोजित केली होती. प्रभागातील महिलांच्या कलागुणांना वाव देणारी ही अभिनव स्पर्धा तितक्याच उत्स्फूर्त सहभागाने अतिशय उत्तमरीत्या संपन्न झाली.

२२ आणि २३ ऑगस्ट रोजी स्पर्धेतील सहभागी महिलांच्या घरी जाऊन या स्पर्धेचं परीक्षण करण्यात आले. सहभागी झालेल्या सर्व महिला स्पर्धकांची कल्पकता, सजावट, संदेश, मेहनत लक्षात घेत प्रथम तीन क्रमांकांसोबत उत्तेजनार्थ बक्षीसे देखील देण्यात आली. तसेच महिलांचा उत्तम सहभाग बघता उत्तेजनार्थ बक्षीसांच्या संख्येत वाढ करण्यात आली.

या स्पर्धेच्या दरम्यान वॉर्डच्या नगरसेविका सौ. पूजा दीपक पवार यांनी आवर्जून प्रत्येक स्पर्धक महिलेच्या घरी उपस्थिती लावून सर्व महिला स्पर्धकांना प्रोत्साहित केले तसेच सहभागी प्रत्येक महिलेला भेटवस्तू देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सौ. पूजाताईंच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सहभागी सर्व स्पर्धक महिलांनी भरभरून कौतुक केले. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धकांनी समाजासाठी अतिशय उत्तम असे संदेशही दिले.

या स्पर्धेमध्ये सौ. पूर्वा विकास चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक सानिका सुर्वे यांनी, तर तृतीय क्रमांक कांचन सामंत यांनी मिळवला. उत्तेजनार्थ बक्षीस अनुक्रमे रश्मी चव्हाण, श्रद्धा पाटोळे, सेजल शिंदे, आदिती चिकोडीकर, अनुजा कालकर यांना प्रदान करण्यात आले. दीपिका कुबल यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ १ सप्टेंबर रोजी जाहीर कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले. स्पर्धेच्या परीक्षक म्हणून सौ. सोनाली संदेश सावंत आणि ॲड. अस्मिता अमित चांदोरकर यांनी काम पाहिले.

ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रभागातील महिला कार्यकर्त्या श्रद्धा कुलकर्णी, श्वेता यादव, काव्या कामतेकर, अंजली सावंत, शरयू पेडणेकर, श्रद्धा पाटोळे, तेजल पाटील, प्रीती लोटणकर, सुप्रिया हरनाल, शिवानी पवार तसेच कार्यकर्ते सुनील शिवलकर, शौर्य मांजरेकर, श्रीयोग चव्हाण, प्रणित चिले, रोहित शिंदे यांनी मेहनत घेतली.

या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिलेल्या सर्व स्पर्धकांचे व स्पर्धा यशस्वी करणाऱ्या सर्वांचे नगरसेविका सौ. पूजा आणि दीपक पवार यांनी आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!