मुख्य बातमी

गणपतीपुळे समुद्रकिनारा पुन्हा बंद; पर्यटकांना समुद्रात न जाण्याचे आवाहन

रत्नागिरी : तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्राची धोकादायक स्थिती अद्याप कायम असल्याने ३ सप्टेंबर रोजी दुपारपासून गणपतीपुळे समुद्रकिनारा पुन्हा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला असून, पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

गणपतीपुळे समुद्रकिनारा मागील सुमारे दोन महिन्यांपासून समुद्राच्या धोकादायक स्थितीमुळे बंद ठेवण्यात आला होता. समुद्राची स्थिती काहीशी सुधारल्यानंतर सुमारे दहा दिवसांपूर्वीच समुद्रकिनारा पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला होता. मात्र, समुद्राची स्थिती पुन्हा धोकादायक बनल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी समुद्रकिनारा बंद करण्याच्या सूचना गणपतीपुळे ग्रामपंचायतीला दिल्या आहेत.

गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रवीण चौधरी यांनी याबाबत माहिती दिली. समुद्रकिनारा बंद करण्यात आल्याने पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि समुद्रात जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, समुद्रकिनारा यापूर्वी सलग दोन महिने बंद राहिल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत समुद्रकिनारा पर्यटकांसाठी सुरू करण्याची आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानंतर समुद्राची धोकादायक स्थिती कमी झाल्याचे लक्षात घेऊन समुद्रकिनारा पुन्हा खुला करण्यात आला होता.

मात्र, अवघ्या दहा दिवसांतच समुद्राची स्थिती पुन्हा धोकादायक झाल्याने प्रशासनाने समुद्रकिनारा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर प्रवेश करता येऊ नये यासाठी समुद्रकिनाऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेट्स लावण्यात आले असून, प्रवेशबंदीचे फलकही लावण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!