रत्नागिरी ग्राहक पेठच्या प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन
नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, महिला, बालकल्याण सभापती प्रीती सुर्वे, नगरसेविका मेधा कुळकर्णी यांची प्रमुख उपस्थिती

रत्नागिरी : गेल्या अनेक वर्षांपासून मी रत्नागिरी ग्राहक पेठेशी जोडलेली आहे. सामाजिक कार्यकर्त्या प्राची शिंदे यांनी अडचणींवर मात करत, अजिबात न डगमगता स्थानिक महिला उद्योगिनींसाठी ग्राहक पेठ १९ वर्षे चालू ठेवली आहे. खरोखरच खरी प्रेरणा तुमच्याकडून आम्हाला घ्यायला हवी. या उद्योगिनींचे पंख मजबूत करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी केले.

जयेश मंगल कार्यालयात रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे शनिवारपासून महिला उद्योगिनींच्या श्रावण महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी शिल्पा सुर्वे बोलत होत्या. याप्रसंगी नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती प्रीती सुर्वे, नगरसेविका मेधा कुळकर्णी, लायन्स क्लबच्या शिल्पा पानवलकर व आयोजक प्राची शिंदे प्रमुख उपस्थित होत्या. तसेच ग्राहक पेठच्या स्वाती सोनार, संध्या नाईक, सईदा बाग उपस्थित होत्या.

नगरसेविका मेधा कुळकर्णी म्हणाल्या की, प्राची ताई कधीही भेटल्या तरी हसतमुख व नेहमी सकारात्मक उर्जा आणि नेहमी काहीतरी नवीन करण्याची उमेद असते. इतकी वर्ष सर्व महिलांना एकत्र घेऊन काम करणे किंवा ग्राहक पेठ राबवणे ही सोपी गोष्ट नाही. महिला बाल कल्याण समिती सभापती प्रीती सुर्वे यांनी महिला उद्योगिनींना दिलेल्या व्यासपीठाबद्दल अभिनंदन केले. आज ७४ व्या वर्षीही तितक्याच कार्यरत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्राची शिंदे प्रास्ताविकात म्हणाल्या की, माझ्या मैत्रिणी, यशश्री बचत गट यामुळे व गेल्या २० वर्षांपासून सर्व मैत्रिणींमुळे २० वर्षे प्रदर्शनाची वाटचाल चालू राहिली. खरोखर तळागाळात पोहोचून महिला उद्योगिनींना व्यासपीठ दिले आहे. सुरुवातीला महिलांचा व्यवसाय वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. हा सर्व प्रवास खूप संघर्षाचा आणि आनंदाचा राहिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा निकम यांनी केले. याप्रसंगी माजी शिक्षिका सईदा बाग यांचा सन्मान करण्यात आला. हे प्रदर्शन ८ सप्टेंबरपर्यंत सकाळी ११.०० ते रात्री ९ पर्यंत खुले आहे. या प्रदर्शनात महिला उद्योगिनींसाठी प्रश्न मंजुषा, फनी गेम्स, फेस्टिव्हल मेकअप, मंगळागौर कार्यक्रम, विपश्यनासंबंधित आनापान प्रात्यक्षिक व माहिती, लायन्स क्लब रत्नागिरी इंटरनॅशनल सेवाभावी संस्थेच्या उपक्रमाची माहिती देण्यात येणार आहे.



