मुख्य बातमी

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला प्रभाग क्रमांक ६ मधील महिलांचा स्नेहमेळावा

पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका मेधा कुळकर्णी यांचा अभिनव उपक्रम

रत्नागिरी : जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत तसेच रत्नागिरीच्या नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक ६ मधील महिलांसाठी नगरसेविका सौ. मेधा अविनाश कुळकर्णी यांच्या पुढाकाराने सिद्धिविनायक हॉल येथे ‘मंगळागौरीचा साज सख्यांच्या सहवासात’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुमारे ३५० महिलांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने मंगळागौरीचे पारंपरिक खेळ, फुगडी, जोगवा, उखाणे तसेच विविध मनोरंजनात्मक उपक्रमांनी हा मंगळागौरीच्या कार्यक्रम उत्साहात रंगला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे यांचे नगरसेविका सौ. मेधा कुळकर्णी यांच्या हस्ते जास्वंदीचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती नगरसेविका सौ. प्रीती सुर्वे, नगरसेविका सौ. पूजा पवार, सौ. श्रद्धा हळदणकर, सौ. वैभवी खेडेकर, सौ. फौजीया मुजावर तसेच सौ. प्राची कीर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

तसेच प्रभागातील महिलांमध्ये शिवसेना महिला आघाडीच्या उपशहर प्रमुख सौ. प्रिया साळवी आणि शिवसेना महिला आघाडीच्या विभाग प्रमुख सौ. सीमा कदम यांच्यासह सौ. संगीता भुवड आणि सौ. संगीता सुर्वे यांच्या हस्ते मान्यवरांचे जास्वंदीचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. सौ. विशाखा भिडे आणि सौ. सायली बेर्डे यांचेही जास्वंदीचे रोप देऊन विशेष स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाला सौ. मीना गर्दे, सौ. मंजिरी लिमये, सौ. सोनाली सावंत, सौ. दीप्ती पंडित, सौ. माधुरी सुर्वे, डॉ. मधुरा सावंत, डॉ. दीप्ती कदम, सौ. अर्चना मुळे, खरेदी विक्री संघाच्या संचालिका ऋतुजा उमेश कुळकर्णी, अस्मिता सरदेसाई, रसिका तेरेदेसाई, सौ. सुहासीनी भोळे, सौ. योगीता खांडेकर, सौ. बाणे यांच्यासह प्रभागातील विविध क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण सभागृहात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरल्या त्या ८८ वर्षीय साळवी आजी. ज्येष्ठत्वाची पर्वा न करता त्यांनी मंगळागौरीच्या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत उपस्थितांना प्रेरणादायी संदेश दिला. त्यांच्या उत्साहाचे विशेष कौतुक करत नगरसेविका सौ. मेधा कुळकर्णी यांनी त्यांचे जास्वंदीचे रोप देऊन विशेष स्वागत केले. त्यांच्या उत्साहपूर्ण उपस्थितीने कार्यक्रमाला एक वेगळेच भावनिक आणि प्रेरणादायी रूप प्राप्त झाले.

या स्वागत सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमात नेहमीप्रमाणे पुष्पगुच्छ न देता जास्वंदीची रोपे देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. स्वागताच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा अभिनव उपक्रम उपस्थित महिलांच्या विशेष पसंतीस उतरला.

यानंतर नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे तसेच उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर उपस्थित महिलांनी पारंपरिक मंगळागौरीचा जोगवा गात कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात केली.

प्रास्ताविक करताना नगरसेविका सौ. मेधा कुळकर्णी म्हणाल्या, “नगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी मला पहिल्यांदाच आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मिळाली असून त्यासाठी मी आपल्या सर्वांची ऋणी आहे. प्रभागातील महिलांना त्यांच्या दैनंदिन धावपळीतून थोडीशी उसंत मिळावी, त्यांनी एकत्र यावे, आपल्या कलागुणांना वाव मिळावा आणि मंगळागौरीच्या निमित्ताने सर्व सखींनी मनसोक्त आनंद घ्यावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.”

प्रभागातील ज्येष्ठ महिला सौ. विशाखा भिडे यांनी मनोगत व्यक्त करताना मेधा कुळकर्णी यांनी अल्पावधीतच प्रभागातील महिलांशी चांगला संपर्क निर्माण केला असल्याचे सांगितले. प्रत्येक महिलेपर्यंत वैयक्तिकरित्या पोहोचून त्यांना कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचे काम मेधाताईंनी केले असल्याचे त्यांनी नमूद केले. महिलांसाठी अशा प्रकारचे विविध उपक्रम यापुढेही सातत्याने आयोजित करावेत, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

महिला व बालकल्याण समितीच्या सभापती नगरसेविका सौ. प्रीती सुर्वे यांनी उपस्थित महिलांना मेधा कुळकर्णी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला लाभलेली महिलांची मोठी उपस्थिती ही मेधाताईंवरील महिलांच्या प्रेमाची आणि विश्वासाची पावती असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे यांनी सांगितले की, शहराची जबाबदारी वाढल्यामुळे प्रत्येक महिलेशी पूर्वीप्रमाणे प्रत्यक्ष संपर्क साधणे काहीसे कठीण होत आहे. मात्र ही उणीव मेधा कुळकर्णी यांनी पूर्णपणे भरून काढली असून, प्रत्येक महिलेशी वैयक्तिक संपर्क साधून त्यांनी या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले. त्यामुळेच आज सुमारे ३५० महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या आहेत, असे सांगत त्यांनी मेधा कुळकर्णी यांच्या कामाचे विशेष कौतुक केले.

यावेळी नगराध्यक्षांनी रत्नागिरी शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती देतानाच पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

यानंतर महिलांसाठी विविध मंगळागौरीचे पारंपरिक खेळ, फुगडी, उखाणे आणि मनोरंजनात्मक स्पर्धा घेण्यात आल्या. यांचे सूञसंचलन प्रथमेश साळवी व ऐश्वर्या बापट यांनी घेऊन महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत वातावरणात चैतन्य निर्माण केले. विविध स्पर्धांमधील विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. विशेष आकर्षण ठरलेल्या पैठणीच्या बक्षिसासह विविध बक्षिसांची लयलूट झाल्याने महिलांचा उत्साह आणखी वाढला.

दैनंदिन धावपळीच्या जीवनातून काही काळ विरंगुळा मिळावा आणि प्रभागातील महिलांमध्ये स्नेह, संवाद व आपुलकीचे नाते अधिक दृढ व्हावे, या उद्देशाने आयोजित केलेला हा कार्यक्रम महिलांसाठी आनंदाची पर्वणी ठरला. मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांना पर्यावरणपूरक स्वागताची जोड देत नगरसेविका मेधा कुळकर्णी यांनी राबविलेला हा अभिनव उपक्रम प्रभाग क्रमांक ६ मध्ये विशेष चर्चेचा ठरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!