मुख्य बातमी

रत्नागिरीला ‘खड्डागिरी’ म्हणून तरी जाहीर करा; लोकप्रतिनिधी सुस्त, नगरपालिका पांघरूण घालण्यात व्यस्त : प्रसाद सावंत

रत्नागिरी : शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून रत्नागिरीचे नामकरण आता ‘खड्डागिरी’ म्हणून करावे अशी वेळ आली आहे. लोकप्रतिनिधी सुस्त झाले असून रत्नागिरी नगरपालिका खड्ड्यांवर पांघरूण घालण्यात व्यस्त असल्याची जहरी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी केली आहे. लोकप्रतिनिधी यांच्यावर आलेल्या “अपना काम बनता भाड में जाये जनता” या गाण्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे रत्नागिरी असल्याचेही ते म्हणाले.

शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ, एसटी स्टँड ते मारुती मंदिर, माळनाका व इतर परिसरात मोठमोठे खड्डे पडले आहेत. गणपती उत्सव तोंडावर आला असताना देखील प्रशासनाला जाग आलेली नाही. भाविकांना, गणेश मंडळांना या खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागत आहे.

सावंत म्हणाले, “नगरपालिका सध्या महागडी, खर्चिक यंत्रणा वापरून खड्डे बुजवत आहे. एक मोठा खड्डा बुजवायला हजारो रुपये खर्च होतोय. माझा सवाल आहे, हा खर्च नगरपालिका का करतेय? ज्या ठेकेदाराने पहिला रस्त्याचा ठेका घेतला, त्या रस्त्याची हमी किती वर्षांची होती? नियमानुसार किती वर्ष रस्त्याची जबाबदारी ठेकेदाराची असते? मग जे नवीन कॉंक्रीट रस्त्याचे टेंडर निघाले असताना हा जो लाखो रुपयांचा खर्च नगरपालिका करत आहे, तो ठेकेदाराच्या बिलातून वसूल करणार का? की हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे?”

लोकप्रतिनिधींनी केवळ नारळ फोडण्यापुरते काम करू नये. जनतेच्या पैशाचा हिशोब द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. सुस्थितीतील गटरवरील पेवर ब्लॉक, दुभाजक आणि त्यामधील झाडं ही अनावश्यक कामं करून जनतेच्या पैशाची राखरांगोळी का करताय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थीत केलाय.

येत्या गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते खड्डेमुक्त करून, झालेल्या खर्चाची वसुली ठेकेदाराकडून करावी असे प्रसाद सावंत म्हणाले. १०० किमी कॉंक्रीट रस्त्याच्या कामाचे पुढे काय झाले याची माहिती नगरपालिकेने जाहीर करावी जेणेकरून जनतेलाही याचे वास्तव समजेल. लोकप्रतिनिधींनी जनतेला गृहीत धरणे आता सोडा अन्यथा रस्त्याने फिरणे मुश्किल होईल अशी परिस्थिती तुमच्यावर उद्भवेल अशी टिपणीही त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!