कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरमध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याची एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरमध्ये नुकतीच संपन्न झाली. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश घराघरात पोहोचवावा आणि पुढील पिढीला या परंपरेची ओळख व्हावी, या उद्देशाने गणेशमूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेच्या सुरुवातीला तज्ज्ञ मूर्तिकार श्रीकांत ढालकर यांनी बालमुर्तिकारांना शाडूची माती कशी मळायची ते शिकवले. त्यांनी शाडूच्या मातीपासून साप, काजू आणि केळे सुंदर पद्धतीने बनवून दाखवले व मुलांचा आत्मविश्वास वाढवला. नंतर गणेश मूर्ती बनवण्यासाठी शाडूच्या मातीचे आकार कसे बनवायचे, याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवले. त्यांनी गणपतीची सुबक मूर्ती बनवली. विद्यार्थ्यांनी देखील सुंदर गणेशमूर्ती बनवल्या. आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हाताने घडविण्याचा आनंद यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. इयत्ता चौथीतील विद्यार्थी उत्साहाने या कार्यशाळेत सहभागी झाले होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. राजवाडे यांनी बाल मूर्तिकारांचे कौतुक केले. तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक श्रीकांत ढालकर यांचा सन्मान करून त्यांना धन्यवाद दिले. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी श्री. गार्डी, श्री. मोरे, श्री. वेदरे , सौ. राजेशिर्के तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.



