अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी अल्पवयीन मुलगा ताब्यात
इन्स्टाग्रामवरील ओळखीतून प्रकार : आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित केल्याचा आरोप

राजापूर : सोशल मीडिया इंस्टग्राम अकाऊंटवर झालेल्या ओळख व मैत्रीतून एका अल्पवयीन युवतीला शहरातील एका लॉजवर नेऊन तीच्यावर अत्याचार करून त्याचे व्हिडीओ करून अन्यत्र व्हायरल करत तीची बदनामी केल्याप्रकरणी राजापूर पोलीसांनी एका अल्पवयीन युवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तशी माहिती राजापूर पोलीसांनी दिली आहे.
या प्रकरणी त्या पिडीत युवतीने राजापूर पोलीसांना तक्रार दिली असून १९ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान कोदवली साईनगर येथील एका लॉजवर हा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. राजापूर शहरात शिक्षणासाठी येत असलेल्या या अल्पवयीन युवतीची राजापुरातच शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन युवकाशी सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ओळख व मैत्री झाली होती. अवघ्या काही दिवसांत झालेल्या या ओळख व मैत्रीतून या अल्पवयीन युवकाने त्या अल्पवयीन युवतीला फुस लावून १९ ऑगस्ट रोजी कोदवली साईनगर येथील लॉजवर नेले व तिच्यावर अत्याचार केला. या युवकाने त्याचे व्हिडीओ शूटिंग केले. यानंतर या युवकाने हा व्हिडीओ आपल्या एका मित्राला वन टाईम व्हू मोडने फॉरवर्ड केला. त्या मित्राने याचे दुसऱ्या मोबाईल द्वारे स्क्रिनिंग करून तो अन्य एका मित्राला पाठविला. याबाबत या अल्पवयीन युवतीच्या चुलत भावाला माहिती मिळाली असता त्याने याबाबत बहिणीला विचारले असता तीने घडला प्रकार सांगितला. अशा प्रकारे या युवकाने आपल्याला लॉजवर नेऊन अत्याचार करून त्याचे व्हिडीओ शूटिंग केल्याचे तिने सांगितले.
यानंतर तात्काळ त्या युवतीने राजापूर पोलीसांत तक्रार दाखल केली आहे. याबाबत तीने विस्तृत माहिती आपल्या फिर्यादित दिली आहे. याप्रकरणी अल्पवयीन युवकाविरोधात राजापूर पोलीसांनी भारतीय न्याय संहिता ६४/१ पोक्सो अंतर्गत ४/८/१२/१४ प्रमाणे व माहिती तंत्रज्ञान अधिनयिम ६७ बी अन्वये गुन्हा दाखल करून त्या युवकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात ज्यांनी ज्यांनी हे व्हिडीओ फॉरवर्ड केल आहेत त्यांचा पोलीस शोध घेत असून त्यांनाही ताब्यात घेतले जाणार आहे. तर या प्रकरणी लॉज मालकाविरोधातही गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलीसांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अमित यादव हे अधिक तपास करत आहेत.



