मुख्य बातमी

श्री गांगोबा प्रतिष्ठानच्या सामाजिक बांधिलकीतून होतकरू विद्यार्थ्याला जीवदान!

किडनी दान करून आईने मुलाला दिला जणू दुसरा जन्म : प्रणयच्या उपचारासाठी तब्बल १० लाखांचा निधी उपलब्ध

रत्नागिरी : पोसरे खुर्द, पंधरा गाव (ता. खेड) येथील रहिवासी असलेल्या महाविद्यालयीन तरुणाला त्याच्या आईने किडनी दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. श्री गांगोबा प्रतिष्ठान यांचे आर्थिक पाठबळ आणि आईने आपल्या मुलासाठी केलेला त्याग यामुळे सर्वच भावूक झाले. प्रणय प्रवीण महापदी असे त्या तरुणाचे नाव आहे.

बीकॉमच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणारा प्रणय याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्याची प्रकृती गंभीर बनली होती. अपोलो हॉस्पिटल (नवी मुंबई) येथील डॉक्टरांनी तातडीने किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला होता. उपचारासाठी अंदाजे १० ते १२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. प्रणयच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने एवढा मोठा खर्च उभा करणे महापदी कुटुंबीयांसाठी मोठे आव्हान होते. मुलाची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असताना आर्थिक मदतीसाठी अनेक ठिकाणी प्रयत्न करण्यात आले; मात्र अपेक्षित मदत मिळत नव्हती. अशा परिस्थितीत प्रणयचे वडील प्रवीण महापदी यांनी श्री गांगोबा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत प्रतिष्ठानने तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला.

संस्थेचे अध्यक्ष कृष्णा माईन, सेक्रेटरी विजय मनोहर माईन, व्यवस्थापक विशाल कृष्णा माईन, प्रकाश सोमा माईन, संजय सीताराम माईन, खजिनदार प्रदीप सापते तसेच सभासद वैभव माईन यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले. अनेक दानशूर व्यक्तींशी संपर्क साधून प्रणयच्या उपचाराची माहिती देण्यात आली. वैभव माईन व संस्थेच्या अध्यक्षांनी डॉक्टरांशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही केली. या सामूहिक प्रयत्नांतून जवळपास तब्बल १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून श्री. महापदी यांच्या खात्यावर सुपूर्द करण्यात आला.

प्रणाली महापदी यांनी आपल्या मुलाला किडनी दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. अपोलो हॉस्पिटल येथे २६ ऑगस्ट रोजी प्रणयची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. त्यानंतर ५ सप्टेंबर रोजी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ८ सप्टेंबर रोजी श्री गांगोबा प्रतिष्ठानच्या सभासदांनी प्रणय, त्याची आई व संपूर्ण महापदी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना धीर दिला. यावेळी महापदी कुटुंबीयांनी प्रतिष्ठानचे आभार मानताना भावना अनावर झाल्या. संकटाच्या काळात प्रतिष्ठानने केलेली १० लाखांची मदत आयुष्यभर विसरणार नसल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

श्री गांगोबा प्रतिष्ठान, निवे खुर्द-माईनवाडी ही संस्था विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत आहे. मार्च २०२६ मध्ये आश्रमशाळा, पडसरे, पाली, रायगड येथील आदिवासी भागातील सुमारे ४०० विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप करण्यात आले होते. या उपक्रमासाठी लोकसहभागातून संस्थेने जवळपास १ लाख २५ हजार रुपयांचा खर्च केला होता. संकटात धावून जाणे आणि गरजूंच्या मदतीला उभे राहणे हीच खरी सामाजिक बांधिलकी. प्रणयच्या उपचारासाठी करण्यात आलेली १० लाखांची मदत ही मानवतेचा आणि सामाजिक एकतेचा प्रेरणादायी आदर्श ठरली आहे. श्री गांगोबा प्रतिष्ठानच्या या कार्याचे परिसरातून सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!