मुख्य बातमी

भोके रेल्वे स्टेशन रस्त्याचे काम पूर्ण

युवती सेना तालुका प्रमुख व सामाजिक कार्यकर्त्या युक्ता आंबेकर यांच्या पाठपुराव्याला यश

रत्नागिरी : तालुक्यातील भोके रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी युवती सेना तालुका प्रमुख व सामाजिक कार्यकर्त्या युक्ता आंबेकर यांनी संबंधित प्रशासनाकडे निवेदन देत सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून भोके रेल्वे स्टेशन रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाची सतत अडथळा ठरत असल्याने रस्त्याचे काम करण्यास अडचणी येत होत्या. मात्र, गणेशोत्सव तोंडावर आला असल्याने या मार्गावर नागरिक व प्रवाशांची मोठी वर्दळ होणार होती. त्यामुळे रस्त्याचे काम तातडीने पूर्ण होणे आवश्यक होते. ही बाब लक्षात घेऊन युक्ता आंबेकर यांनी महामार्ग अधिकारी कुलकर्णी साहेब यांच्याकडे विशेष विनंती करून गणेशोत्सवापूर्वी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. त्यांच्या विनंतीची तत्काळ दखल घेत संबंधित यंत्रणेने कामाला गती दिली आणि अवघ्या एका दिवसात या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले.

पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचणे, चिखल आणि खडीमुळे वाहनचालक तसेच नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग असल्याने रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जनतेच्या प्रश्नांसाठी दिलेले निवेदन आणि त्यानंतर सातत्याने केलेला पाठपुरावा यामुळे हा प्रश्न मार्गी लागला असून, हा नागरिकांच्या मागणीला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.

याबाबत बोलताना युक्ता आंबेकर यांनी प्रशासनाचे आभार मानले असून, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी यापुढेही सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे सांगितले.

दरम्यान, रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!