लोटे येथे मोकाट गुराच्या धडकेत भाजप पदाधिकाऱ्याचा मृत्यू

खेड : पत्नीला भेटण्यासाठी मोटारसायकलवरून चिपळूणच्या दिशेने जात असताना लोटे येथे महामार्गावर फिरणाऱ्या मोकाट गुराला दुचाकीची जोरदार धडक बसून खेड येथील भाजपचे सक्रिय पदाधिकारी नईम बशीर चौगुले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास जुन्या महामार्गावरील पोलीस चौकीजवळ हा भीषण अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, नईम चौगुले मोटारसायकलवरून चिपळूणच्या दिशेने जात असताना अचानक महामार्गावर आलेल्या गुराला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचे मोठे नुकसान झाले, तर धडक बसलेले जनावरही जागीच मृत झाले. हेल्मेट परिधान केलेले असतानाही नईम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील नईम चौगुले यांना उपचारासाठी चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने खेड शहरासह परिसरात शोककळा पसरली आहे.
नईम बशीर चौगुले हे खेड भाजपचे सक्रिय पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. अॅड. वैभव खेडेकर यांचे विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांची ओळख होती. पक्षाच्या विविध उपक्रमांसह सामाजिक कार्यात ते नेहमीच सक्रिय सहभाग घेत असत. कोणत्याही सामाजिक कामासाठी पुढाकार घेण्याची त्यांची वृत्ती आणि मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता.
खेड बसस्थानक परिसरात त्यांनी स्वतःचे मोबाईल शोरूम उभे केले होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कष्ट, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी व्यवसाय उभा केला होता. व्यवसायासोबतच सामाजिक क्षेत्रातही योगदान देण्याची त्यांची धडपड सुरू होती. होतकरू व मेहनती तरुण म्हणून त्यांनी अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.
रात्रीच्या वेळी मुंबई-गोवा महामार्गावर मोकाट गुरे फिरत असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महामार्गावर अचानक गुरे आल्याने वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण होत असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी मोकाट गुरांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
नईम चौगुले यांच्या अपघाती मृत्यूची बातमी खेड शहरात पोहोचताच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार व परिचितांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच अनेकांनी चिपळूण येथील रुग्णालयाकडे धाव घेतली. होतकरू, मेहनती आणि सामाजिक जाण असलेल्या तरुणाचा अशा प्रकारे अकाली मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवार असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने खेडच्या राजकीय व सामाजिक वर्तुळातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
महामार्गावरील मोकाट गुरांमुळे आणखी किती जीव जाण्याची वाट पाहणार? असा संतप्त सवालही या दुर्घटनेनंतर स्थानिकांकडून उपस्थित केला जात असून, संबंधित प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.



