मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

मुंबई-गोवा महामार्गावरील खवटीजवळ दुचाकी खड्ड्यात कोसळून अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तरुणी गंभीर जखमी

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील खवटी गावानजीक रविवारी सकाळी सुमारे ६.४० वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून, मागे बसलेली तरुणी गंभीर जखमी झाली आहे. सतीश निवृत्ती पाटे (वय २९, रा. पोलादपूर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून, अक्षता अरविंद कवडे (वय २८, रा. चिपळूण) या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या आनंदासाठी सतीश पाटे आणि अक्षता कवडे हे दोघे दुचाकीवरून पोलादपूरहून चिपळूणच्या दिशेने प्रवास करत होते. चिपळूणकडे येत असताना खवटी गावानजीक दत्त मंदिरासमोर दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ती महामार्गालगत असलेल्या तब्बल २५ ते ३० फूट खोल खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात सतीश पाटे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अक्षता कवडे या गंभीर जखमी झाल्या.

घटनेची माहिती मिळताच मदतकार्य तात्काळ सुरू करण्यात आले. जगद्गुरु रामानंदचार्य श्री नरेंद्र्राचार्यजी महाराज संस्थान, नाणीजधाम यांच्या वतीने भरणे नाका ब्रिजखाली अपघातासाठी २४ तास कार्यरत असणारी मोफत रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जखमी अक्षता कवडे यांच्यासह सतीश पाटे यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती सतीश पाटे यांना मृत घोषित केले. गंभीर जखमी अक्षता कवडे यांच्यावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!