जिल्हास्तरीय टेबल टेनिस निवड चाचणी स्पर्धा उत्साहात संपन्न

चिपळूण : डेरवण येथील एसव्हीजेसीटी क्रीडा संकुल येथे नुकत्याच जिल्हास्तरीय टेबल टेनिस निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील ६० हून अधिक खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ११, १३, १५, १७ व १९ वर्षांखालील मुले व मुली अशा विविध वयोगटांमध्ये सामने खेळविण्यात आले.जिल्ह्यातील विविध भागांतून सहभागी झालेल्या खेळाडूंनी उत्कृष्ट व दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करत उपस्थितांची दाद मिळविली. विशेषतः १७ व १९ वर्षांखालील गटातील सामने अत्यंत अटीतटीचे आणि रंगतदार झाले.
१५ वर्षांखालील मुलांच्या गटात विधीत सकपाळ याने विजेतेपद पटकाविले, तर कुलदीप गोऱ्हारे याने उपविजेतेपद मिळविले. चिन्मय चव्हाण याने तृतीय क्रमांक मिळविला.
१७ वर्षांखालील मुलांच्या गटात अर्णव दळी याने रोमहर्षक सामने जिंकत प्रथम क्रमांक पटकाविला. वेदांत सुर्वे याने द्वितीय, तर अधिराज तावडे याने तृतीय क्रमांक मिळविला. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात पायल बोनबोरे हिने विजेतेपद मिळविले. अनिष्का महाडिक उपविजेती ठरली, तर विजयश्री चव्हाण हिने तृतीय क्रमांक पटकाविला.
१९ वर्षांखालील मुलांच्या गटातील अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा झाला. त्यामध्ये चिन्मय माजुरकर याने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकाविले. वेदांत सुर्वे याने रौप्यपदक, तर अधिराज तावडे याने कांस्यपदक मिळविले. १९ वर्षांखालील मुलींच्या गटातही अत्यंत चुरशीचे सामने पाहायला मिळाले. सुहाना भडवळकर हिने प्रथम क्रमांक मिळविला, तर दीक्षा मोरे हिने द्वितीय आणि धृवी घाणेकर हिने तृतीय क्रमांक पटकाविला.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास रत्नागिरी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष अजित गालवणकर, प्रशिक्षक राकेश खांडेकर, सोमनाथ सुरवसे, प्रदीप यादव आदि मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजयी खेळाडूंची मालवण, सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या प्रादेशिक टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसह झालेली ही जिल्हास्तरीय टेबल टेनिस निवड चाचणी स्पर्धा आमच्यासाठी खूपच समाधानकारक ठरली. अशी प्रतिक्रिया या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता चिन्मय माजुरकर यांनी दिली.
उत्कृष्ट टेबल, योग्य प्रकाशयोजना आणि खेळाडूंना लागणारे सर्व आधुनिक सोयीसुविधा यामुळे सामने अधिक दर्जेदार झाले. अशा स्पर्धांमुळे नवोदित खेळाडूंना स्पर्धात्मक वातावरणाचा अनुभव मिळतो आणि त्यांचा आत्मविश्वास दुणावतो. नियमित सराव व शिस्तबद्ध प्रशिक्षणासोबतच असा दर्जेदार अनुभव मिळाल्यास आपल्या जिल्ह्यातील मुलांमधून नक्कीच राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकणारे खेळाडू घडतील, असे क्रीडा शिक्षक राकेश खांडेकर यांनी मत व्यक्त केले.



