मुख्य बातमी

मिरकरवाडा बंदरातील मोडकळीस आलेल्या विनावापर नौका २२ सप्टेंबरपर्यंत हटवा; मत्स्यव्यवसाय विभागाचा इशारा

रत्नागिरी : येथील मिरकरवाडा बंदरात अनेक नौका मालकांनी मोडकळीस आलेल्या, विनावापर असलेल्या नौका, नौका केबिन व अनावश्यक साहित्य अस्ताव्यस्त ठेवल्याने बंदरातील दैनंदिन कामकाज व वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधितांनी हे साहित्य स्वखर्चाने दिनांक २२ सप्टेंबर २०२६ पर्यंत तात्काळ हटवावे, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागामार्फत करण्यात आले आहे.

सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, मुदतीत साहित्य न हटवल्यास मत्स्यव्यवसाय विभागाकडून दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून हे सर्व साहित्य बंदरामधून हटविण्याची थेट कारवाई करण्यात येईल. या कारवाईदरम्यान होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस प्रशासन जबाबदार राहणार नाही आणि नुकसान भरपाईचा कोणताही दावा ग्राह्य धरला जाणार नाही. तसेच या संपूर्ण कारवाईचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे.

२३ सप्टेंबर रोजी जेट्टीवर अनधिकृत पार्किंगला सक्त मनाई

मोहिमेच्या दिवशी म्हणजेच २३ सप्टेंबर रोजी मिरकरवाडा जेट्टी परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना अनधिकृत पार्किंग करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या दिवशी अनधिकृत पार्किंग करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!