मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

नवी मुंबईत महाबोधी महाविहार लिबरेशन कौन्सिल ऑफ इंडियाची दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद

गुहागर (संदेश कदम) : महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी देशभरात लढा देणाऱ्या विविध बौद्ध संघटना, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते, तज्ञ आणि स्वयंप्रेरणेने सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना एकत्र करून महाबोधी महाविहार लिबरेशन कौन्सिल ऑफ इंडिया (एमएलसी) या राष्ट्रीय कौन्सिलची स्थापना केली आहे. या कौन्सिलच्या मुंबई शाखेतर्फे १९ आणि २० सप्टेंबर अशी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. ही परिषद डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, सेक्टर ४८, सीवूड, नवी मुंबई येथे होईल.

यासाठी सर्व राज्यांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले असून, यात कौन्सिल सदस्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड, भारत सरकारला सादर करण्यासाठी चार्टर ऑफ डिमांड आणि राष्ट्रीय स्तरावरील आंदोलनाची दिशा या प्रमुख विषयांवर चर्चा होणार आहे. या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी / नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या हस्ते होणार असून,दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आदरणीय आनंदराज यशवंत आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे.

कौन्सिलच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्तीचा लढा न्यायालयीन स्तरावर लढण्यात येत असून, त्याचबरोबर सरकारला निवेदन देणे, जनमाणसात प्रचार-प्रसार करणे अशा दोन्ही स्तरांवर संघर्ष सुरू आहे. बोधगया मंदिर कायदा रद्द करणे, महाबोधी विहाराच्या व्यवस्थापनासाठी केंद्रीय कायदा करणे, महाबोधी विहाराचे संरक्षण, व्यवस्थापन, नियंत्रण, मालकी भारतीय बौद्धांच्या ताब्यात देणे, महाबोधी विहाराला प्राचीन राष्ट्रीय स्मारकाच्या यादीत समाविष्ट करणे या कौन्सिलच्या भारत सरकारकडे प्रमुख मागण्या आहेत.

राष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाची माहिती पत्रकार परिषदेत मुंबई शाखेचे सदस्य हरिश्चंद्र पवार, दादासाहेब मर्चंडे, ॲड. दिलीप काकडे यांनी दिली. यावेळी कौन्सिलचे सदस्य शशिकांत भालेराव, ॲड. विजय तळेकर, संदीप साबळे, डॉ. मुकेश दुपारे, कुशलकुमार जंगलबाग उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!