वणौशी-दुमदेव ग्रामस्थांचा दाभोळ अणुऊर्जा प्रकल्पाला सामूहिक विरोध
काळेश्वरी देवीसमोर साकडे घालत ‘प्रकल्प नकोच’चा एकमुखी निर्धार

दापोली : तालुक्यातील वणौशी तर्फे पंचनदी गावाच्या भिवबंदर तसेच आघारी महसुली गावाच्या हद्दीत प्रस्तावित असलेल्या २८०० मेगावॅट क्षमतेच्या अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांकडून पहिला सामूहिक विरोधाचा सूर उमटला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभाग आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार झाल्यानंतर वणौशी तर्फे पंचनदी येथील ग्रामदैवत श्री काळेश्वरी मंदिरात स्थानिक तसेच मुंबईवासीय ग्रामस्थांची सभा झाली. या सभेत ‘निसर्गसंपन्न भूमीत अणुऊर्जा प्रकल्प नकोच,’ असा एकमुखी निर्धार व्यक्त करण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांनी देवीसमोर गाऱ्हाणे घालत, ‘हा प्रकल्प वरच्यावरच जिरू दे,’ अशी प्रार्थना केली.
भिवबंदर व आघारी परिसरात हा प्रकल्प प्रस्तावित असल्याची माहिती विविध वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमधून समोर आली आहे. मात्र, या प्रकल्पाबाबत स्थानिक ग्रामपंचायतीला अथवा ग्रामस्थांना शासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, अशी नाराजी सभेत व्यक्त करण्यात आली. त्यामुळे समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमांतून मिळालेल्या माहितीनंतर गावाच्या भवितव्याचा विचार करण्यासाठी स्थानिक आणि मुंबईस्थित ग्रामस्थांनी एकत्रितपणे ही सभा आयोजित केली.
सभेत ग्रामस्थांनी परिसरातील पर्यावरणीय परिस्थितीचा दाखला देत अणुऊर्जा प्रकल्पाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. लोटे एमआयडीसीमधील रासायनिक सांडपाण्यामुळे वाशिष्ठी नदी आणि दाभोळ खाडीतील मत्स्यसाठ्यावर परिणाम होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. अनेकदा मासे मृत पावत असतानाही या समस्येवर प्रशासनाकडून अपेक्षित उपाययोजना होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
सध्या असलेल्या पर्यावरणीय प्रश्नांवर उपाय होत नसताना अणुऊर्जा प्रकल्पामुळे भविष्यात फळबागा, शेती, मत्स्यसंपदा आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. सर्व काही सुरळीत सुरू असताना हा प्रकल्प हवा आहे कोणाला?’ असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. भावी पिढ्यांचे आरोग्य आणि परिसराचे पर्यावरण लक्षात घेऊन हा प्रकल्प गावावर लादू नये, अशी मागणीही करण्यात आली.
विशेष म्हणजे, सभेत सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून ग्रामस्थ एकत्र आले. प्रकल्पाला विरोध करण्यासाठी पुढील काळात आवश्यक त्या सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याबरोबरच जनआंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आला. त्यामुळे दाभोळ अणुऊर्जा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर विरोधाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे.



