संगमेश्वर रोड रेल्वेस्थानकावर थांब्यासाठी रेल्वे प्रशासनाचे वेधले अनोख्या पद्धतीने लक्ष
‘उंदीरमामां'नी केली स्टेशन मास्तरांच्या तक्रार वहीत नोंद

खेड : संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर चार साप्ताहिक एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, या मागणीसाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाचे अनोख्या पद्धतीने लक्ष वेधण्यात आले. गणरायाचे वाहन असलेल्या ‘उंदीरमामा’च्या माध्यमातून ही मागणी मांडत स्टेशन मास्तरांकडे असलेल्या तक्रार वहीत त्याची अधिकृत नोंद करण्यात आली.
संगमेश्वर रोड स्थानकावर १०११५/१०११६ बांद्रा–मडगाव एक्सप्रेस, १६३११/१६३१२ श्री गंगानगर एक्सप्रेस, १२९७७/१२९७८ अजमेर–एर्नाकुलम एक्सप्रेस आणि ०२१९७/०२१९८ जबलपूर–कोयंबतूर एक्सप्रेस या चार साप्ताहिक गाड्यांना थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
गणेशोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. आता उत्सवाची सांगता होत असल्याने मुंबईसह अन्य शहरांकडे परतीचा प्रवास सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने करण्यात येत आहे.
चारही गाड्यांना संगमेश्वर रोड येथे थांबा मिळाल्यास संगमेश्वर तालुक्यासह परिसरातील प्रवाशांना मुंबई, राजस्थान, उत्तर भारत, केरळ, मध्य प्रदेश तसेच दक्षिण भारतातील विविध भागांमध्ये प्रवास करण्यासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार आहे.
प्रवाशांची मागणी आणि संगमेश्वर रोड स्थानकावरील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने या चारही साप्ताहिक एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या वातावरणात ‘उंदीरमामा’च्या माध्यमातून करण्यात आलेल्या या अनोख्या मागणीची रेल्वे स्थानक परिसरात चांगलीच चर्चा रंगली.


