माभळे येथे गणपती विसर्जनावेळी वडील-मुलगा नदीपात्रात बुडाले
मुलाचा दुर्दैवी मृत्यू, तर वडिलांना वाचवण्यात यश

संगमेश्वर : तालुक्यातील माभळे येथे सोनवी पात्रात गणपती विसर्जनावेळी वडील-मुलगा नदीपात्रात बुडाल्याची घटना शनिवारी (१९ सप्टेंबर) सायंकाळी घडली. या दुर्घटनेत मुलगा प्रज्वल पुरूषोत्तम घडशी (वय २२) याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर वडिल पुरुषोत्तम गुणाजी घडशी यांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेने माभळे गावावर शोककळा पसरली आहे. तर घडशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडशी कुटुंबीय व ग्रामस्थ संगमेश्वर पोलीस ठाण्यासमोरील बावनदीच्या काठावर गणपती विसर्जनासाठी गेले होते. विसर्जन करत असताना पाण्याचा व खोलीचा अंदाज न आल्याने पुरुषोत्तम आणि प्रज्वल हे दोघेही प्रवाहात वाहून जाऊ लागले. मुलगा आणि नातू बुडत असल्याचे दिसताच आजोबा गुणाजी घडशी व ग्रामस्थ दत्ताराम घडशी यांनी मदतीसाठी धाव घेतली. प्रज्वलने आजोबांचा हात पकडण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे त्याचा हात सुटला. दरम्यान, श्रीकांत घडशी यांनी जीवाची पर्वा न करता नदीत उडी मारून पुरुषोत्तम यांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर काही युवकांनी २० मिनिटे शोधमोहिम राबवत प्रज्वलला नदी बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत उशिर झाला होता. दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण माभळे गाव शोकसागरात बुडाला आहे.



