तटरक्षक दलाच्या पश्चिम क्षेत्राची ‘आंतरक्षेत्रीय क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप २०२६’ रत्नागिरीत दिमाखात संपन्न
१० किमीच्या आव्हानात्मक मार्गावर जवानांचा कस

रत्नागिरी : भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीच्या यजमानपदाखाली तटरक्षक दलाच्या पश्चिम क्षेत्राची प्रतिष्ठेची आणि अत्यंत चुरशीची ‘आंतरक्षेत्रीय क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप २०२६’ आज सकाळी मोठ्या उत्साहात आणि लष्करी शिस्तीत संपन्न झाली. या प्रतिष्ठित चॅम्पियनशिपला कमांडर तटरक्षक महाराष्ट्र उपमहानिरीक्षक सुधाकर पाटील, त प यांनी मिरजोळे एमआयडीसी स्थित तटरक्षक कार्यालयाच्या प्रांगणातून हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.
या वार्षिक चॅम्पियनशिपमध्ये तटरक्षक पश्चिम क्षेत्राच्या विस्तृत कार्यकक्षेत येणाऱ्या महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ ही राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश दमण येथील विविध तटरक्षक मुख्यालये, जहाजे, हवाई अवस्थान आणि तटरक्षक तळांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या एकूण ५ संघांतील प्रत्येकी ६ म्हणजेच एकूण ३० निवडक व सर्वोत्तम धावपटू जवानांनी सहभाग नोंदवला. तटरक्षक अवस्थानच्या प्रांगणातून सुरू झालेली ही १० किलोमीटर अंतराची आव्हानात्मक स्पर्धा परिसरातील चढ-उतार आणि वळणावळणाचा रस्ता अशा मार्गावरून मार्गक्रमण करत पुन्हा भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीच्या प्रांगणातच यशस्वीरीत्या समाप्त झाली. दमट व उष्ण हवामानाची तमा न बाळगता, सहभागी धावपटूंनी दाखवलेला अप्रतिम वेग, अतुलनीय स्टॅमिना आणि अंतिम रेषेपर्यंत जिद्दीने धावण्याची वृत्ती उपस्थितांची मने जिंकणारी ठरली. मार्गावर ठिकठिकाणी वैद्यकीय पथके, जलसंजीवनी (हायड्रेशन) केंद्र आणि तटरक्षक दलाच्या जवानांद्वारे चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
“शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक कणखरता आणि अढळ लष्करी शिस्त हा कोणत्याही संरक्षण दलाचा खरा कणा असतो. प्रतिकूल सागरी परिस्थिती आणि आव्हानात्मक मोहिमांमध्ये यश संपादन करण्यासाठी केवळ अत्याधुनिक साधनसामग्री पुरेशी नसते, तर त्यामागे जवानांचे पोलादी मनोधैर्य, शारीरिक क्षमता आणि परस्परांवरील अतूट विश्वास आवश्यक असतो. क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून हीच संघभावना आणि अपयशातून उसळी मारून ध्येय गाठण्याची जिद्द जवानांमध्ये निर्माण होते,” असे प्रेरणादायी प्रतिपादन उपमहानिरीक्षक सुधाकर पाटील यांनी या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखविताना केले. याप्रसंगी भारतीय तटरक्षक वायू अवस्थान रत्नागिरीचे कमांडिंग ऑफिसर उपमहानिरीक्षक कुणाल सी नाईक, भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीचे कमांडिंग ऑफिसर समादेशक शैलेश गुप्ता, स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी, अधीनस्थ अधिकारी व जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या क्रॉस कंट्री स्पर्धेत विजेतेपद पटकावण्यासाठी संघांमध्ये अखेरच्या सेकंदापर्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळाली. सांघिक गटात भारतीय तटरक्षक वायु अवस्थान दमण तर वैयक्तिक गटात भारतीय तटरक्षक वायु अवस्थान दमणचेच हायजिनिस्ट केतन मंगेला हे विजेते ठरले. स्पर्धेच्या सांगता समारंभात मुख्य अतिथी उपमहानिरीक्षक सुधाकर पाटील यांच्या हस्ते विजेत्या ठरलेल्या सांघिक संघाला प्रतिष्ठेचा चषक प्रदान करण्यात आला. तसेच वैयक्तिक गटात चमकदार कामगिरी करून अव्वल क्रमांक पटकावणाऱ्या सर्वोत्कृष्ट धावपटूंना पदके, प्रशस्तिपत्रके आणि गौरवचिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी सर्व संघांचे, मार्ग व्यवस्थापन व पंच समितीचे आभार मानण्यात आले. भारतीय तटरक्षक दल हे स्पर्धात्मक भावना आणि सामान्य लोकांमध्ये फिटनेसबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि तरुणांना सशस्त्र दलात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन नियमितपणे करत असते.



