माझी भूमिका शेतकऱ्यांसोबतच राहणार : खासदार सुनील तटकरे

रत्नागिरी : “दापोलीतील शेतकऱ्यांचा अणुऊर्जा प्रकल्पाला पूर्ण विरोध आहे, हे मला माहिती आहे. मी पाच तारखेला मंडणगड-दापोली आणि सहा तारखेला गुहागर-खेडच्या दौऱ्यावर आहे, त्यावेळी शेतकऱ्यांची मते जाणून घेईन. माझी भूमिका शेतकऱ्यांसोबतच राहील, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मांडले.
आज (२८ सप्टेंबर) येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बाबाजी जाधव, बशीर मुर्तुझा, ॲड. देवेंद्र वणजू, नौसीन काझी आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी स्थानिक वादापासून शेतकरी प्रश्न आणि निवडणूक आयोगापर्यंत सर्व मुद्द्यांवर भाष्य केले.
दापोलीतील विकास कामांच्या वादावर ते म्हणाले, “मी गेली ४० वर्ष संयमित राजकारण केले आहे. माझा कोणाशीही वाद नाही. या जिल्ह्याचा ५-६ वर्ष पालकमंत्री म्हणून काम केले आहे. मी सुचवलेली कामे माझ्या अंगणातील नव्हती, तर वाड्या-वस्त्यांमधील सार्वजनिक हिताची कामे होती. त्याला विरोध करणे हे सामाजिक पाप आहे. मला कोणाकडे काम मागण्याचे कारण नाही, मी ५ वेळा लोकसभेत माझ्या पद्धतीने निवडून आलो आहे.”
ते पुढे म्हणाल, “मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे भयावह परिस्थिती आहे. शरद पवार यांनी सूचना केल्या असतील, तर सरकार त्याचा विचार करेल. पण महायुती सरकार शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आहेच. गेले आठ दिवस मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण सरकार बांधावर जाऊन पोहोचले आहे. पंचनाम्याच्या कागदावरची माहिती आणि प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेली परिस्थिती यात मोठा फरक आहे.”
“प्रत्येक संस्थेला विश्वासार्हता टिकवावी लागते. आयोगाने कायद्याच्या चौकटीत उत्तर दिले आहे. प्रश्न-उत्तर, क्रिया-प्रतिक्रिया हाच लोकशाहीचा गाभा आहे. आमची वाटचाल NDA मध्ये कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.


