मुख्य बातमी

घनकचरा व्यवस्थापनाचा तारीखनिहाय अहवाल सादर करा; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

कामात पारदर्शकता आणण्यासाठी 'सेंट्रलाइज पोर्टल' विकसित करण्याची सूचना

रत्नागिरी : जिल्ह्यातील ग्रामीण तसेच नागरी भागात घनकचरा व्यवस्थापन नियमांच्या अंमलबजावणीबाबत सर्व संबंधित विभागांनी आतापर्यंत केलेल्या कामांचा सविस्तर तारीखनिहाय अहवाल आणि छायाचित्रे तातडीने सादर करावीत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.

घनकचरा व्यवस्थापन नियम अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष कक्षाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा प्रशासन अधिकारी वैभव गारवे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी संदीप टोपे उपस्थित होते.

कचरा व्यवस्थापनाच्या कामांमध्ये गतिमानता आणि अचूकता राहावी यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने एक सुसज्ज ‘सेंट्रलाइज पोर्टल’ विकसित करावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. या डिजिटल पोर्टलवर सर्व संबंधित यंत्रणांनी केलेल्या कामगिरीची नोंद ठेवली जाणार असून, कामाचा थेट आढावा घेणे शक्य होणार आहे.

कडक अंमलबजावणीचे आदेश

ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींपासून ते शहरी भागातील नगरपालिका व नगरपंचायतींपर्यंत कचरा संकलन, वर्गीकरण आणि प्रक्रियेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे, असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी नियम मोडणाऱ्या घटकांवर कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले. बैठकीदरम्यान उप मुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील व जिल्हा प्रशासन अधिकारी वैभव गारवे यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!