मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

पिशेदवाडीत जल अर्पण दिन उत्साहात

जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण

राजापूर : सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत जल जीवन मिशनच्या माध्यमातून ग्रामपंचायत भालावल्लीतर्फे महसूल गाव पिशेदवाडी येथे जल अर्पण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आज (३० सप्टेंबर) आयोजित कार्यक्रमात जल जीवन मिशनअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचे ग्रामपंचायतीकडे तसेच ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडे हस्तांतरण करण्यात आले.

‘गाव स्वतःच्या पाण्याचा मालक व्हावे’ या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, पंचायत समिती राजापूर पी. एस. पोवार, सरपंच प्रकाश ह. घवाळी तसेच ग्रामस्थांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

कार्यक्रमाला उपसरपंच विलास शिवगण, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एन. एम. सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत दळवी, प्रवीण जाधव, सदस्या उषा उ. मराठे, पाणी व स्वच्छता विभागाचे कमलेश जोशी व मनिषा पळसमकर यांच्यासह पिशेदवाडी ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.

जल जीवन मिशनअंतर्गत उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनांची देखभाल, पाणी व्यवस्थापन आणि उपलब्ध पाण्याचा योग्य वापर यामध्ये ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गावातील पाणीपुरवठा व्यवस्था सक्षमपणे चालविण्यासाठी ग्रामपंचायत आणि ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीने जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहनही करण्यात आले.

कार्यक्रमाची प्रस्तावना व आभारप्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी उज्वला नांदगावकर यांनी केले. ग्रामस्थांच्या सहभागामुळे जल अर्पण दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!