आर्टिकल

अहिंसेचे सत्याग्रही : महात्मा गांधी

सन १९३९ मध्ये महात्मा गांधी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाइन यांना महात्मा गांधी यांच्या कार्याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, येणाऱ्या पिढ्यांना कदाचित यावर विश्वास ठेवणेही कठीण जाईल की, असा एक मनुष्य प्रत्यक्ष हाडामांसाच्या देहात या पृथ्वीवर चालत होता. त्यांचे हे विधान पुढे Out of My Later Years या पुस्तकात प्रकाशितही झाले. याचा अर्थ असा होता की, आइन्स्टाइन यांना गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वात केवळ एक राजकीय नेता दिसत नव्हता; त्यांना सत्य, अहिंसा आणि नैतिक धैर्याच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडविणारा एक अद्वितीय मानव दिसत होता.

त्यांच्या कार्याचा आणि चरित्राचा अभ्यास केला असता असे निदर्शनास येते की, गांधीजींच्या कार्याने हिंसेशिवायही अन्यायाविरुद्ध संघर्ष करता येतो, हे जगाला दाखवून दिले. म्हणूनच गांधीजींचा देह सन १९४८ मध्ये संपला असला, तरी त्यांचे विचार आजही जगाच्या विवेकाला प्रश्न विचारत उभे आहेत.

व्यापारी बनून आलेल्या इंग्रजानी १८५७ च्या उठावानंतर भारताच्या सर्वच विभागात आपली सत्ता मजबूत केली. सर्वत्र त्यांचीच राजवट सुरू झाली. अशा इंग्रजी सत्तेच्या काळात गांधीजींचा २ ऑक्टोबर १८६९ रोजी पोरबंदरच्या मातीत, पुतळाबाई व करमचंद यांच्या पोटी जन्म झाला. या एका गावात जन्मलेले मोहनदास करमचंद गांधी भविष्यात केवळ भारताचे राष्ट्रपिता म्हणून नव्हे, तर सत्य आणि अहिंसेचा संदेश जगाला देणारे वैश्विक व्यक्तिमत्त्व म्हणून उदयास आले आणि एका छोट्याशा संस्थानात जन्मलेला हा बालक पुढे साम्राज्यवादाला आव्हान देईल आणि जगाच्या राजकीय इतिहासाला अहिंसेची नवी भाषा शिकवेल, याची कल्पना त्या वेळी कुणालाही नसावी.

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपले पुढचे शिक्षण पूर्ण करत बॅरिस्टर ही पदवी प्राप्त केली. घरात असणारी गर्भश्रीमंतपणा त्यांना सर्व सुखसोयीची उपलब्धता करून देणारा होती. मुळात गांधीजींच्या महान व्यक्तिमत्त्वामागे जन्मतःच कोणतीही अलौकिकता नव्हती. तेही चुका करणारे एक सामान्य बालक होते. त्यामुळे लहानपणी केलेल्या चोरीची कबुली दिल्याने वडिलांनी शिक्षा करण्याऐवजी अश्रूंनी दिलेली प्रतिक्रिया गांधीजींच्या मनावर कायमची कोरली गेली. या प्रसंगातून सत्याची ताकद आणि अहिंसेची करुण शक्ती त्यांच्या मनात अधिक दृढ झाली. त्या महात्म्याच्या जीवनात या छोट्याशा बालपणीच्या प्रसंगाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. तेंव्हापासून गांधीजींनी सातत्याने सदैव सत्याचा आग्रह धरत राहिले, अहिंसेचा विचार करत राहिले. त्यातूनच पुढे त्यांनी जगाला सत्याग्रह आणि अहिंसेचा मार्ग दाखवला. म्हणूनच ते महान बनू शकले. महात्मा गांधी यांच्या कार्याकडे पाहिले तर असे लक्षात येते की, महात्मा होणे म्हणजे कधीही चूक न करणे नव्हे; तर स्वतःची चूक ओळखून ती प्रामाणिकपणे स्वीकारणे आणि स्वतःला बदलणे होय. जे गांधीजींनी केले.

इंग्रजांच्या विरोधात अत्यंत आक्रमकपणे; पण तेवढ्याच अहिंसेने त्यांनी छोटी – छोटी आंदोलने करत देशव्यापी जनआंदोलन उभारले. त्यांच्या एका आवाहनावर संपूर्ण देश घरावर तुळशीपत्र ठेवून देशासाठी प्राणार्पण करण्यासाठी तयार होत असे. दक्षिण आफ्रिका देशातील यशस्वी आंदोलनानंतर त्यांनी देशात जनचळवळ उभारली. त्यातून गुलामगिरीत असलेल्या देशाला त्यांनी या आंदोलनातून स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांनी या संपूर्ण आंदोलनात कधीही अहिंसा, सत्य सोडले नाही. त्यामुळे त्यांच्यावर अनेकदा टीका झाली, विरोध झाला, त्यांची खिल्ली उडवली गेली. मात्र गांधीजींनी कधीही त्याचा खेद केला नाही वा कधीही वाईट वाटून घेतले नाही. सातत्याने अत्यंत नम्रपणे आपली भूमिका वा विचार सर्वाना पटतील वा न पटतील यापेक्षा मी माझ्या विचारांवर ठाम असल्याची भूमिका आग्रही धरली. त्यामुळे इंग्रजांनाही गांधीजी अत्यंत हट्टी व आग्रही वाटले. म्हणूनच एकेकाळी विस्टन चर्चिल सारख्या विद्वान नेत्याने आणि ब्रिटिश सरकारने त्यांच्या वागण्यावरून, आंदोलन करण्याच्या पद्धतीवरून आणि पोशाखावरून त्यांना नंगा फकीर (Naked Fakir) असे खिजवूनही त्यांनी आपल्या भूमिकेशी तडजोड केली नाही वा भूमिका बदलली नाही. ब्रिटिश सरकारच्या मुख्यालयात म्हणजेच लंडनमध्ये जाऊनही त्यांनी आंदोलनाची दिशा बदलली नाही. एवढेच कशाला गांधीजींच्या अहिंसेची व्याप्ती एवढी विलक्षण होती की, त्यांनी हुकूमशहा हिटलरला पत्र लिहून महायुद्ध थांबविण्याची विनंती केली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर, हिंसेच्या मार्गावर चालणाऱ्या हिटलरला गांधीजींनी ‘Dear Friend’ असे संबोधले. युद्ध मानवजातीला पुन्हा रानटी अवस्थेत नेईल, असा इशारा त्यांनी या पत्रातून देत त्याला युद्ध टाळण्याचे आवाहन केले. विरोधकाला शत्रू मानून त्याचा द्वेष करण्याऐवजी त्याच्या विवेकाला साद घालणे, हीच गांधीजींच्या अहिंसेची खरी ताकद होती.

म्हणूनच सत्य, अहिंसा, प्रेम, समता, सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशकता यावर आधारित विचारसरणीचा त्यांनी आयुष्यभर पुरस्कार केला. त्यांनी कधीही वरील मुल्यापासून फारकत घेतली नाही वा यापासून ते कधीही दूर गेले नाहीत. म्हणून जेवढे समर्थन वा पाठिंबा त्यांना त्यांनी उभारलेल्या भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या आंदोलनात मिळाले, त्यापेक्षाही कमी – अधिक प्रमाणात त्यांना त्यांच्या विरोधकांकडून तिरस्कार मिळाला. त्यामुळे त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या चारित्र्यहननापर्यंत मजल मारली, पण ना त्यांचे चारित्र्य कलंकित झाले ना त्यांच्या आंदोलनातील यशाचे प्रमाण. १९४२ ला गांधीजींनी करेंगे या मरेंगे असा उद्घोष करत इंग्रजांना चले जावं म्हटले, त्यावर संपूर्ण देश इंग्रजांच्या विरोधात उभा राहिला आणि त्याचा परिणाम म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाले. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दुर्दैवाने भारताची फाळणी झाली आणि देशात प्रचंड विस्फोटक परिस्थिती निर्माण झाली. ती का निर्माण झाली? यावर विचार करण्यापेक्षा अनेकांनी त्याचा दोष गांधीजींवर ठेवला. तरीही गांधीजीनी अहिंसेचा मार्ग सोडला नाही. कधीही आणि कुणालाही त्यांनी उत्तर दिले नाही. आपल्या कृतीने त्यांनी त्यास उत्तर दिले. गांधीजींच्या आयुष्यात त्यांच्यावर टीका झाली, त्यांच्याविरुद्ध प्रचार झाला, त्यांच्या भूमिकांबद्दल गैरसमज निर्माण झाले; पण त्यांनी प्रत्येक टीकेला वैयक्तिक वैराचे रूप दिले नाही. गांधीजींच्या राजकीय प्रवासात त्यांना ब्रिटिश सत्तेकडून, भारतीय राजकीय विरोधकांकडून आणि त्यांच्या काही समकालीनांकडूनही तीव्र टीका सहन करावी लागली. काहींना त्यांचा अहिंसेचा मार्ग फार मवाळ वाटत होता, तर काहींना तोच मार्ग अतिशय संघर्षात्मक वाटत होता. काहींनी त्यांच्या सामाजिक आणि राजकीय भूमिकांवरही प्रश्न उपस्थित केले. तरीही गांधीजी कधी हतबल झाले नाहीत वा कधी निराश झाले नाहीत. काहींनी तर गांधीजी मुळे क्रांतीकारकांना त्रास झाल्याचे रंगवून सांगितले. तरीही गांधीजी ढळले नाहीत. मुळात गांधीजींनी विरोधक असणे आणि शत्रू असणे यात त्यांनी फरक केला. त्यांच्या विचारातील एक महत्त्वाचा आधार होता माझे सत्य हे अंतिम सत्य नसून, सत्याचा शोध घेण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे स्वतःच्या भूमिकेचे परीक्षण करण्याची तयारी त्यांनी ठेवली. मात्र त्यावर कधीही कुणीही बोलले नाही, उलट त्यांच्यावरच दोषारोप ठेवत राहिले. असे असूनही किंवा असे घडत असतानाही त्यांनी आपली भूमिका बदलली नाही वा विचारावरील निष्ठा हटवली नाही. ते सतत आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. भूमिकेवर स्थिर राहिले; पण त्यांच्या स्थिरतेचा अर्थ हट्ट नव्हता. ते स्वतःच्या भूमिकेचा पुनर्विचार करू शकत होते; पण सत्य, अहिंसा आणि माणुसकी या मूलभूत मूल्यांशी तडजोड करण्यास ते तयार नव्हते.

थोडक्यात सांगायचे झाल्यास आजच्या विद्वेषपूर्ण वातावरणात आणि स्वार्थान्ध विचारसरणीत गांधीजींच्या सर्वसमावेशकतेचा विचार हा सर्वांचे भले करणारा आहे. त्यासोबतच आजच्या सोशल मीडियाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या तरुणाईसाठी हा गांधीविचार विशेष महत्त्वाचा ठरतो. एखाद्या व्यक्तीविषयी गैरसमज निर्माण झाला की तो काही क्षणांत हजारो लोकांपर्यंत पोहोचतो. टीका अनेकदा वैयक्तिक द्वेषात बदलते. अशा वेळी गांधीजींचा मार्ग आपल्याला सांगतो. प्रत्येक आरोपाला रागाने उत्तर देण्यापेक्षा सत्य तपासा; प्रत्येक विरोधकाला शत्रू मानण्यापेक्षा संवाद साधा आणि लोकांच्या मतांपेक्षा आपल्या अंतःकरणातील सत्याशी प्रामाणिक राहा.

म्हणून १९४८ ला गांधीजींची हत्या झाली. त्यानंतरही अनेकदा त्यांची शाब्दिक हत्या झाली. त्यांनी आयुष्यभर जपलेल्या मुल्यांची हेटाळणी झाली. मांडलेल्या विचारांचा तिरस्कार झाला. जवळपास पाच दशके केलेल्या कार्याची टिंगलटवाळी झाली. एवढ्यावरच न थांबता शेवटी त्यांची हत्या करण्यात आली. असे झाले तरीही गांधीजींच्या विरोधी विचारसरणीला त्यांच्या विचारांची हत्या करता आली नाही. त्यांचे विचार वा कार्य नष्ट करता आले नाही. त्यांच्या कार्याची महती संपविता आली. आणि त्यांच्या विचारांची बरोबरी विरोधकांकडून होऊ शकली नाही. कारण व्यक्तीला गोळीने संपवता येते; पण सत्य, अहिंसा आणि माणुसकीसारख्या मूल्यांना संपवता येत नाही. गैरसमजांच्या वादळातही आपल्या मूल्यांवर स्थिर राहण्याची गांधीजींची ही शिकवण आजच्या अस्थिर आणि द्वेषपूर्ण वातावरणात अधिकच अर्थपूर्ण ठरते. अशा या निःस्वार्थी आणि निरपेक्ष महात्म्याला त्यांच्या १५७ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

– श्री. माधव रतनबाई विश्वनाथ अंकलगे,

वाटद खंडाळा, पो. वाटद,

ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३.

संपर्क – ९७६४८८६३३० / ९०२१७८५८७४.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!