मुख्य बातमी

राजापूर तहसील कार्यालयात ५ ऑक्टोबरला ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत’

नागरिक व शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे तहसीलदारांचे आवाहन

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागामार्फत महसूल विभागातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे आपापसातील तडजोडीने व सहमतीने निकाली काढण्यासाठी राज्यभरात ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत राजापूर तहसील कार्यालयात येत्या सोमवारी (५ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील शेतकरी व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार विकास गंबरे यांनी केले आहे.

शासनाने हे अभियान १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्यास मान्यता दिली असून, दर तीन महिन्यांतून एकदा महसूल अदालत आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार राजापूर तहसील कार्यालयाकडील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या संमतीने निकाली काढली जाणार आहेत.

या अभियानात प्रामुख्याने जमिनीचे हिस्से व हक्कांबाबतचे वाद, जमिनीचे वाटप दावे तसेच वहिवाटीच्या रस्त्यांबाबतचे वाद आपापसांतील तडजोडीने व सहमतीने कायमस्वरूपी निकाली काढण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

ज्या कार्यालयात महसुली दावा किंवा अपील प्रलंबित आहे, तेथे संबंधित दोन्ही पक्षकारांनी स्वतः अथवा आपल्या वकिलामार्फत शासन निर्णयातील ‘प्रपत्र-अ’ मधील नमुन्यानुसार तडजोडीसाठी अर्ज सादर करावा. अर्जांची छाननी करून पक्षकारांची संमती निश्चित केली जाईल. त्यानंतर नियमानुसार तडजोडनामा तयार करून लोकअदालतीच्या दिवशी दोन्ही पक्षांच्या संमतीने अंतिम आदेश पारित करण्यात येतील.

या उपक्रमामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली प्रकरणे सुलभतेने निकाली निघण्यास मदत होणार असून, नागरिकांचा वेळ आणि न्यायालयाच्या फेऱ्यांचा खर्च वाचणार आहे. तसेच महसूल यंत्रणेवरील ताणही कमी होईल. संबंधित पक्षकार व नागरिकांनी ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार कार्यालय, राजापूर येथे उपस्थित राहून या महसूल लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!