मुख्य बातमी

‘आरटीओ’च्या सेवा संकल्प अभियानाला मोठा प्रतिसाद; ४३१ नागरिकांना मिळाले लर्निंग लायसन्स

रत्नागिरी : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये विशेष शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरांमधून ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या दारातच शिकाऊ वाहन चालक अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) उपलब्ध करून देण्यात आली असून, तालुकानिहाय शिबिरांमध्ये तब्बल ४३१ उमेदवारांना लर्निंग लायसन्सचे वितरण करण्यात आले आहे. यासोबतच जिल्हा मुख्यालय कार्यालयातही ३७४ लाभार्थ्यांनी या सेवेचा लाभ घेतला.

तालुकास्तरीय शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना थेट सेवा मिळावी या उद्देशाने प्रशासनाने नियोजनबद्ध पावले उचलली होती. संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांच्या हस्ते उमेदवारांना अधिकृतरीत्या लायसन्स वाटप करण्यात आले.

तालुकानिहाय लाभार्थी संख्या : लांजा (१७ सप्टेंबर) – ५९, राजापूर (१८ सप्टेंबर) – ३४, गुहागर (२१ सप्टेंबर) – १६, चिपळूण (२२ सप्टेंबर) – ६०, दापोली (२३ सप्टेंबर) – ७४, खेड (२४ सप्टेंबर) – ८५, देवरुख (२८ सप्टेंबर) – ५५, मंडणगड (३० सप्टेंबर) – ४८.;

केवळ परवाने वाटप न करता, शिबिरास उपस्थित सर्व उमेदवारांमध्ये रस्ता सुरक्षिततेविषयी जनजागृती करण्यात आली. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतुकीचे नियम, विविध रस्ते चिन्हे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर आणि सुरक्षित वाहन चालवण्याच्या पद्धतींविषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

हे अभियान उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. शिबिरांच्या यशस्वीतेसाठी मोटार वाहन निरीक्षक जावीद शिकलगार तसेच सहायक मोटार वाहन निरीक्षक अक्षय ल. पाटील, इंद्रजीत मोहिते, सत्यवंत पाटील, मोहसीन आवटी आणि अवधुत कुंभार यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!