नेवरे येथे पोषणमहा व आरोग्य तपासणी उपक्रम उत्साहात

रत्नागिरी : सेवा संकल्प अभियान व ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अंतर्गत तालुक्यातील ग्रामपंचायत नेवरे येथे पोषणमहा व आरोग्य तपासणी कार्यक्रम घेण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत आरोग्य उपकेंद्र नेवरे यांचे वतीने यावेळी शाळेतील किशोरवयीन मुला-मुलींची हिमोग्लोबिन (एचबी) तपासणी करून आरोग्य व पोषणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
किशोरवयीन मुलींना ‘एचबी’चे महत्त्व, ॲनिमियाची लक्षणे, सकस आहार, पालेभाज्या, गूळ-शेंगदाणे, खजूर, डाळिंब व लिंबूवर्गीय पदार्थांचा आहारात समावेश करण्याबाबत माहिती देण्यात आली. तसेच शाळेत दिल्या जाणाऱ्या आयएफए निळ्या गोळ्या नियमित घेणे, जेवणानंतर चहा-कॉफी टाळणे, मासिक पाळीतील स्वच्छता व वैयक्तिक स्वच्छता याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. कमी एचबी’ आढळलेल्या विद्यार्थिनींना पुढील तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला देण्यात आला.
या उपक्रमात एनसीडी आरोग्य तपासणी – ७१, किशोरी एचबी तपासणी – ३९, रक्त तपासणी – ७१, आभा कार्ड – २, इ-केवायसी – ५, स्पुटम कलेक्शन – ५ तसेच संशयित मोतीबिंदू – २ रुग्णांची नोंद करण्यात आली.
कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य राजेश साळवी, पंचायत समिती सदस्य पूर्वा दुर्गवली, बालविकास प्रकल्प अधिकारी संदीप पाटील, आरोग्य निरीक्षक डॉ. परशुराम निवेंडकर व राजेंद्र रणसे, मुख्य सेविका भागवत, सीएचओ माधुरी ठाकरे, आरोग्य सेविका स्वाती कदम, आरोग्य सेवक संकेत कासेकर, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते.
या उपक्रमामुळे किशोरवयीन मुलींमध्ये रक्तक्षय प्रतिबंध, पोषण व आरोग्यविषयक जनजागृतीला चालना मिळाली.



