आयरिश चक्रवर्तीची अवघ्या सतराव्या महिन्यात जागतिक विक्रमाला गवसणी
महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या मार्गदर्शनाखाली १०० मीटर जलतरण यशस्वीरीत्या पूर्ण

रत्नागिरी : रत्नागिरीच्या क्रीडा वर्तुळात पुन्हा एकदा सुवर्णअध्याय लिहिला गेला आहे. येथील नामांकित ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’च्या मार्गदर्शनाखाली अवघ्या १७ महिन्यांच्या चिमुकल्या आयरिश चक्रवर्तीने १०० मीटर जलतरण यशस्वीरीत्या पूर्ण करून थेट जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. पाठीवर तरंगत इतक्या अल्पवयात ही कामगिरी करणारा तो जगातील सर्वात लहान जलतरणपटू ठरला आहे.
रत्नागिरीच्या शासकीय जलतरण तलावामध्ये हा ऐतिहासिक विक्रम साकार झाला. २५ बाय २१ मीटरच्या तलावात सलग चार फेऱ्या मारत आयरिशने १०० मीटरचे अंतर अवघ्या १६ मिनिटे आणि ४५ सेकंदात पार केले. त्याच्या या विस्मयकारक पराक्रमाने साऱ्यांच्याच अंगावर काटा आणला. विशेष म्हणजे, या जागतिक विक्रमाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’, ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये अधिकृत नोंद झाली असून, ‘गिनिज बुक’ व ‘लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’चे कन्फर्मेशनही लवकरच मिळणार आहे.
आयरिशचे पालक दुबईहून भारतात परतल्यानंतर त्यांनी पुण्यात सरावाचा प्रयत्न केला होता; परंतु लहान वयामुळे तिथे अडचणी आल्या. अशातच त्यांनी ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’च्या नावावर आणि अनुभवावर विश्वास ठेवून थेट रत्नागिरी गाठली. या ग्रुपमध्ये आल्यानंतर अवघ्या ५ महिन्यांच्या अल्प कालावधीत मुख्य प्रशिक्षक महेश मिलके, गौरी मिलके, करण मिलके आणि तनया मिलके यांनी आयरिशला घडवले. या अनुभवी प्रशिक्षकांनी दाखवलेले शास्त्रोक्त तंत्र, अचूक मार्गदर्शन आणि घेतलेल्या विशेष परिश्रमांमुळेच हा चमत्कार शक्य झाला आहे.
एका कोवळ्या जीवाने वयाच्या अवघ्या १७ व्या महिन्यात केलेल्या या जागतिक कामगिरीमुळे रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या अभूतपूर्व यशानंतर संपूर्ण क्रीडा जगतातून आयरिश चक्रवर्ती आणि मिलके कुटुंबावर कौतुुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



