क्रीडामुख्य बातमी

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

सन २०२४-२५ व २०२५-२६ च्या पुरस्कारांसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत : जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत सन २०२४-२५ आणि सन २०२५-२६ या दोन वर्षांच्या प्रतिष्ठित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू तसेच साहसी उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींकडून १२ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील गुणवंत क्रीडापटू आणि क्रीडा क्षेत्रात आयुष्यभर मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान केले जातात. या अंतर्गत विविध श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जातात. जीवन गौरव पुरस्कार : क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय व दीर्घकालीन कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षींसाठी.

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक / जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार : पुरुष व महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) : उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूंसाठी.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम): साहसी क्रीडा प्रकारांत भाग घेणाऱ्या धाडसी व्यक्तींसाठी.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू): उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिव्यांग क्रीडापटूंसाठी.

रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र व इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू आणि साहसी क्रीडापटूंनी विहित मुदतीत क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर [https://sports.maharashtra.gov.in](https://sports.maharashtra.gov.in) जाऊन १५ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत आपले अर्ज सादर करावेत.

अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, कोणत्याही परिस्थितीत ऑफलाइन अथवा प्रत्यक्ष स्वरूपात अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे क्रीडा विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्रीडापटूंनी या संधीचा लाभ घेऊन वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!