मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

डोंगर-दऱ्यांचे खडतर आव्हान पेलत महावितरणचे ‘मिशन म्हाप्रळ’ फत्ते

४८ तासांच्या अथक परिश्रमांनंतर परिसर पुन्हा प्रकाशमान

मंडणगड : निसर्गाचे रौद्र रूप, पायाखाली निसरड्या कडांचे खोल उतार आणि घनदाट डोंगराळ भाग… अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्यनिष्ठेची एक अनोखी मिसाल घालून दिली आहे. मंडणगड तालुक्यातील बोलाडेवाडी ते चिंचाळी धरण या अत्यंत दुर्गम भागात दोन दिवस रात्रंदिवस युद्धपातळीवर धावपळ करून अखेर म्हाप्रळ आणि पंचक्रोशीतील वाड्यांचा अंधार दूर करण्यात महावितरणला यश आले. तब्बल ४८ तासांनंतर, २१ ऑक्टोबर रोजी रात्री वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला आणि संपूर्ण परिसराने सुटकेचा निश्वास टाकला.

१९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी म्हाप्रळ परिसराची वीज अचानक खंडित झाली. तपासणीअंती ११ के.व्ही. उच्चदाब वाहिनीचे तब्बल ११ विजेचे खांब जमीनदोस्त झाल्याचे समोर आले. हे सर्व खांब ज्या भागात कोसळले होते, तो भाग म्हणजे बोलाडेवाडी ते चिंचाळी धरणाचा अत्यंत खडतर आणि दुर्गम टापू. तिथे वाहने पोहोचणे अशक्य, धोकादायक वळणे आणि अंगावर येणारा तीव्र उतार! अशा ठिकाणी नवे जड पोल, तारा आणि इतर साहित्याची ने-आण करणे हे केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे, तर यंत्रसामग्रीसाठीही मोठे आव्हान होते.

परिस्थिती कितीही कठीण असली तरी ग्राहकांना लवकरात लवकर दिलासा देणे हेच एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांचे पथक थेट मैदानात उतरले. खांद्यावरून ओझे वाहत, तांत्रिक अडचणींना सामोरे जात या पथकाने अवघ्या दोन दिवसांत कोसळलेले सर्व ११ खांब बदलून नवी वीजवाहिनी उभारली. कष्टाची शर्थ करून सलग दोन दिवस घेतलेल्या या मेहनतीला अखेर यश आले.

हे अशक्यप्राय काम वेळेत पूर्ण होण्यामागे सामूहिक प्रयत्नांची मोठी ताकद उभी राहिली. या मोहिमेत महावितरणचे कंत्राटदार M/s AG Industries चे श्री. अलदार व श्री. बिजापूरे, ‘साहिल इलेक्ट्रिकल’चे रूपेश सपकाळ तसेच ‘M/s क्रांती इलेक्ट्रिकल्स’चे महेंद्र जगताप यांनी विशेष पुढाकार घेत मोलाचे सहकार्य केले. याशिवाय लघुदाब वाहिनी सुरळीत करण्यासाठी श्री. पवार (श्रवण इलेक्ट्रिकल), सुमेद वैद्य, पंकज घाग (यश इलेक्ट्रिकल), श्री. मोडक (श्री इलेक्ट्रिकल) आणि ३३ के.व्ही. पालगड वाहिनीसाठी श्री. पिंगळे (ऋषिकेश इलेक्ट्रिकल) यांनी खांद्याला खांदा लावून मदत केली.

या मोहिमेत सर्वात कौतुकास्पद ठरली ती म्हाप्रळच्या स्थानिक ग्रामस्थांची साथ. या संकटाच्या काळात ग्रामस्थ स्वतःहून पुढे आले आणि कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी मदत केली. स्थानिक लोकांचे हे सहकार्य कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणारे ठरले.

महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार आणि स्थानिक गावकरी यांच्यातील अजोड समन्वय व सांघिक भावनेमुळेच हे महाकठीण काम वेळेत तडीस गेले, अशा शब्दांत उपकार्यकारी अभियंता, मंडणगड यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. महावितरणच्या या तत्पर आणि धाडसी कामगिरीचे सध्या म्हाप्रळ परिसरातून भरभरून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!