जिल्ह्यात कुपोषण निर्मूलनासाठी आरोग्य विभाग व महिला-बाल विकास विभागाचा समन्वित पुढाकार
‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत बालकांची नियमित तपासणी; ‘लड्डू गोपाल योजना’ व ‘जॉईंट स्क्रिनिंग मोहिमे’द्वारे कुपोषित बालकांना पोषण व उपचारांचा आधार

रत्नागिरी : बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे, कुपोषणाचे वेळेत निदान व्हावे आणि कुपोषित बालकांना योग्य पोषण व वैद्यकीय उपचार मिळावेत, या उद्देशाने जिल्हा परिषद रत्नागिरीच्या आरोग्य विभाग आणि महिला व बाल विकास विभागामार्फत समन्वयाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांची नियमित आरोग्य तपासणी करून तीव्र कुपोषित (SAM) व मध्यम कुपोषित (MAM) बालकांची ओळख पटविणे, त्यांना आवश्यक उपचार उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या पोषणस्थितीत सुधारणा घडवून आणणे यावर विशेष भर देण्यात येत आहे.
आरबीएसके पथकांमार्फत नियमित तपासणी
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकारी व पथकांसह प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून बालकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येते. अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्या समन्वयातून बालकांच्या वाढीवर लक्ष ठेवले जाते. कुपोषणाची लक्षणे आढळल्यास संबंधित बालकांची पुढील तपासणी, उपचार आणि आवश्यकतेनुसार संदर्भसेवा उपलब्ध करून दिली जाते.
‘लड्डू गोपाल योजना’ व ‘जॉईंट स्क्रिनिंग मोहिमे’चा आधार
कुपोषित बालकांना पोषण व वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग आणि डेरवण येथील वालावलकर रुग्णालय यांच्या समन्वयाने ‘लड्डू गोपाल योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत SAM व MAM बालकांना विशेष पौष्टिक लाडू पुरविण्यात येतात. रुग्णालयातील तज्ज्ञ पथकामार्फत बालकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या वजनात व आरोग्यात सुधारणा होण्यासाठी नियमित फॉलो-अप घेतला जातो.
जॉईंट स्क्रिनिंग मोहिमेद्वारे ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी करण्याबरोबरच गर्भवती माता, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींच्या हिमोग्लोबिन (Hb) तपासणीवरही भर देण्यात येत आहे. रक्तक्षयाचे प्रमाण कमी करणे, माता व बालकांचे पोषण सुधारणे आणि आवश्यकतेनुसार उपचार उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश आहे.
गावपातळीवरील समन्वयातून कुपोषण निर्मूलनाकडे वाटचाल
अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वयातून गावपातळीवर तपासणी व उपचार केले जात आहेत. आवश्यकतेनुसार कुपोषित बालकांना ग्राम बालविकास केंद्रात (VCDC) दाखल करून अतिरिक्त पोषण व उपचार दिले जातात. तसेच मातांना स्तनपान, पूरक आहार आणि संतुलित पोषण आहाराबाबत समुपदेशन करण्यात येते. आवश्यकतेनुसार संदर्भसेवा उपलब्ध करून दिली जाते
‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत गावातील सार्वजनिक आरोग्य, माता-बाल आरोग्य, पोषण आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा यांना बळकटी देण्यावर भर दिला जात आहे. आरोग्य विभाग आणि महिला व बाल विकास विभागाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे बालकांचे नियमित निरीक्षण, कुपोषणाचे लवकर निदान आणि योग्य उपचार यांना गती मिळत आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक बालक निरोगी, सुदृढ आणि कुपोषणमुक्त व्हावे, या ध्येयाने दोन्ही विभागांच्या समन्वयातून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.-डॉ.अनिरुद्ध आठल्ये. जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा परिषद रत्नागिरी



