टपाल विभागाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी ६ नोव्हेंबर रोजी मुंबईत ‘डाक पेन्शन अदालत’; ४ नोव्हेंबरपर्यंत तक्रारी सादर करण्याचे आवाहन

रत्नागिरी : टपाल विभागाच्या निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी नोव्हेंबर २०२६ ची मासिक पेन्शन अदालत ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही अदालत मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई-४००००१ यांच्या कार्यालयात होणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील टपाल विभागातून निवृत्त झालेले कर्मचारी किंवा ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झाला आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन लाभांशी संबंधित तक्रारींचे ३ महिन्यांच्या आत निवारण झालेले नसेल, तर अशा प्रकरणांचा या पेन्शन अदालतीमध्ये विचार केला जाईल.
वारसा प्रमाणपत्र, वेतनश्रेणी वाढविणे यांसारखे पूर्णपणे कायदेशीर बाबींचे प्रश्न, धोरणात्मक विषय तसेच शिस्तभंग कारवाई आणि डीपीसी (DPC) च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा या अदालतीत विचार केला जाणार नाही.
पेन्शनधारकांनी आपली तक्रार वैयक्तिकरित्या विहित नमुन्यात तीन प्रतींमध्ये सादर करणे आवश्यक आहे. एकत्रित स्वरूपात किंवा इतरांच्या वतीने केलेली तक्रार स्वीकारली जाणार नाही.
तक्रार अर्ज ‘वरिष्ठ लेखाधिकारी / सचिव, पेन्शन अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ इमारत, पहिला मजला, मुंबई – ४००००१’ या पत्त्यावर प्रत्यक्ष/टपालाने पाठवावा किंवा accts.mh@indiapost.gov.in या ई-मेल आयडीवर दिनांक ०४ नोव्हेंबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


